Champions Trophy 2025 Prize Money : आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेनं आगामी चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेसाठीच्या बक्षिसांची घोषणा केली आहे. फायनल बाजी मारून चॅम्पियन होणाऱ्या संघावर आयसीसीकडून पैशांची 'बरसात' करण्यात येईल. याशिवाय उप विजेतेपदावर समाधान मानाव्या लागणार संघही मालामाल होणार आहे. एवढेच नाही तर स्पर्धेत सहभागी असलेल्या प्रत्येकाला बक्षीस देण्याची योजना आयसीसीने आखली आहे. प्रत्येक मॅचमधील विजेत्यालाही रोख रक्कमेच्या स्वरुपात बक्षीस दिले जाणार आहे. २०१७ च्या गत हंगामाच्या तुलनेत यावेळी आयसीसीने बक्षीसाची रक्कम अधिक मोठी केल्याचे दिसून येते.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
कुणाला किती बक्षीस मिळणार?
८ संघाचा सहभाग असलेल्या स्पर्धेतील विजेत्या संघाला तब्बल २.२४ मिलियन अमेरिकन डॉलर म्हणजेच जवळपास २० कोटी रुपयांचे बक्षीस देण्यात येणार आहे. उपविजेत्या संघाला १.१२ मिलियन अमेरिकन डॉलर म्हणजे जवळपास १० कोटी रुपये रोख रक्कम बक्षीस स्वरुपात दिली जाणार आहे. सेमीफायनलमध्ये पराभूत दोन्ही संघाला प्रत्येकी ५ लाख 60 हजार अमेरिकन डॉलर म्हणजे ५ कोटी रुपये इतकी रक्कम बक्षीस स्वरुपात मिळेल.
प्रत्येक सामन्यासाठी वेगळ बक्षीस, तळाला राहिलेल्या संघालाही मिळणार आर्थिक लाभआयसीसीनं यंदाच्या स्पर्धेत ६.९ मिलियन अमेरिकन डॉलर बक्षीस जाहीर केले आहे. २०१७ च्या तुलनेत बक्षिसांच्या रक्कमेत ५३ टक्के इतकी वाढ करण्यात आली आहे. फक्त विजेत्यालाच नाही तर प्रत्येक सामना महत्त्वपूर्ण आहे, हे अधोरेखित करण्यासाठी आयसीसने प्रत्येक सामन्यातील विजेत्याला बक्षीसाची घोषणा केली आहे. साखळी फेरीतील विजेत्या संघाला ३४ हजार अमेरिकन डॉलर इतकी रक्कम वेगळी देण्यात येईल. पाचव्या आणि सहाव्या स्थानावर राहिलेल्या संघाला प्रत्येकी साडे तीन लाख डॉलर आणि सातव्या आणि आठव्या क्रमांकावरील संघाला १ लाख ४० हजार अमेरिकन डॉलर एवढी रक्कम बक्षीस स्वरुपात देण्यात येणार आहे.
जय शाह यांनी केली घोषणा, म्हणाले...
आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी पात्र ठरलेल्या प्रत्येक संघाला अतिरिक्त १ लाख २५ हजार डॉलर इतकी रक्कम दिली जाणार आहे. आयसीसीचे अध्यक्ष जय शाह यांनी चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेसाठीच्या बक्षिसांची घषणा केली. यावेळी ते म्हणाले की, ही मोठी बक्षीस रक्कम खेळातील गुंतवणूकीसह आयोजनाच्या जागतिक प्रतिष्ठा अधोरेखित करणारी आहे.”