Join us  

आताच्या पाकिस्तानी संघात काहीच दम नाही; भारताची 'दादा'गिरी अन् गांगुलीकडून शेजाऱ्यांची धुलाई

Sourav Ganguly on Pakistan team : वन डे विश्वचषकात भारतीय संघाने पाकिस्तानचा दारूण पराभव केला.

By ऑनलाइन लोकमत | Published: October 17, 2023 10:33 PM

Open in App

भारताने कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानचा दारूण पराभव करून वन डे विश्वचषकात शेजाऱ्यांविरूद्ध सलग आठव्यांदा विजय मिळवला. नेहमीप्रमाणे भारतीय संघाने आपले वर्चस्व कायम राखताना पाकिस्तानचा दारूण पराभव केला. वन डे विश्वचषकात शनिवारी कट्टर प्रतिस्पर्धी आमनेसामने होते. सामन्यापूर्वी अनेक जाणकार तसेच पाकिस्तानचे माजी खेळाडू रंगतदार सामन्याची अपेक्षा करत होते. पण, भारतीय कर्णधार रोहित शर्माने (८६) स्फोटक खेळी करून सगळ्यांची बोलती बंद केली. बाबर आझमच्या संघाच्या पराभवानंतर पाकिस्तानसह भारताच्या देखील माजी खेळाडूंनी शेजाऱ्यांना डिवचले. आताच्या पाकिस्तानी संघात दबाव हाताळण्याची क्षमता नसल्याची टीका गांगुलीने केली.

सौरव गांगुली म्हणाला की, आमच्या वेळचा पाकिस्तानी संघ वेगळा होता. आम्ही ज्या पाक संघाविरूद्ध खेळलो तो आणि विद्यमान संघ यात खूप फरक जाणवतो. या पाकिस्तानच्या संघात काहीच दम दिसत नाही. आताचा संघ फलंदाजीत अजिबात दबाव हाताळू शकत नाही. त्यामुळे जर अशीच फलंदाजी कायम राहिली तर पाकिस्तानला या विश्वचषकात पुनरागमन करणे कठीण जाईल. गांगुली 'टाइम्स नाउ' या वृत्तसंस्थेशी बोलत होता. 

दरम्यान, २९ षटकांत १५५-२ अशी चांगली सुरुवात करूनही पाकिस्तानने शेवट खराब केला. टीम इंडियाने शेजाऱ्यांना चीतपट करताना केवळ १९१ धावांवर रोखले. बाबर आझम (५०) आणि मोहम्मद रिझवान (४९) वगळता एकाही पाकिस्तानी फलंदाजाला साजेशी खेळी करता आली नाही. भारतीय गोलंदाजांनी सांघिक खेळी करून पाकिस्तानच्या फलंदाजांचा करेक्ट कार्यक्रम केला. 

पाकिस्तानचा दारूण पराभवशेजाऱ्यांचा दारूण पराभव करून भारताने चालू विश्वचषकात विजयाची हॅटट्रिक लगावली. पाकिस्तानी संघाने नाणेफेक गमावून प्रथम फलंदाजी करताना ४२.५ षटकांत सर्वबाद केवळ १९१ धावा केल्या. पाकिस्तानने दिलेल्या १९२ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना भारताने आक्रमक सुरूवात केली. विश्वचषकात पदार्पण करत असलेल्या शुबमन गिलने काही चांगले फटकार मारले पण त्याला शाहीन आफ्रिदीने जास्त वेळ टिकू दिले नाही. मग कर्णधार रोहित शर्माने पाकिस्तानी गोलंदाजांचा चांगलाच समाचार घेतला. त्याने ६ चौकार आणि ६ षटकार मारून ६३ चेंडूत ८६ धावांची खेळी केली. याशिवाय श्रेयस अय्यरने नाबाद ५३ धावा करून भारताच्या विजयावर शिक्कामोर्तब केला.

टॅग्स :वन डे वर्ल्ड कपसौरभ गांगुलीभारतीय क्रिकेट संघभारत विरुद्ध पाकिस्तानबाबर आजम