नवी दिल्ली : भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (बीसीसीआय) अध्यक्ष सौरव गांगुली कोविड-१९ महामारीमुळे झालेल्या नुकसानामुळे दु:खी आहे. त्यांनी या संकटाची तुलना धोकादायक खेळपट्टीवर कसोटी सामना खेळण्यासोबत केली आहे. भारताच्या या माजी कर्णधाराने कोरोना व्हायरसमुळे लॉकडाऊनच्या दिवसातील जीवनावर चर्चा केली.
फीव्हर नेटवर्कतर्फे सुरू करण्यात आलेल्या ‘१०० अवर्स १०० स्टार्स’ कार्यक्रमात बोलताना गांगुली म्हणाले,‘सध्याची स्थिती म्हणजे धोकादायक खेळपट्टीवर कसोटी सामना खेळण्यासारखी आहे. जेथे चेंडू सिमही होतो आणि स्पिनही होतो. फलंदाजांकडे चूक करण्याचा कुठलाच पर्याय नसतो. त्यामुळे फलंदाजाला चूक न करता आपली विकेट राखत धावा फटकावून विजय मिळवून द्यावा लागेल.’गांगुलीने त्याच्या काळातील अनेक दिग्गज वेगवान गोलंदाज व फिरकीपटूंना समर्थपणे तोंड दिले आणि यशही मिळवले. या डावखुऱ्या फलंदाजाने सामन्यातील कठीण क्षण व सध्याची स्थिती एकसारखी असल्याचे म्हटले आहे. स्थिती कठीण असली तरी आपण संयुक्त प्रयत्नांनी ही लढत जिंकण्यात यशस्वी ठरू.’ गांगुली केवळ दु:खीच नाही तर त्यांनाही या आजाराची भीती वाटत असल्याचे त्यांनी कबूल केले.
गांगुली म्हणाले,‘या आजारामुळे अनेकांनी आपला जीव गमावला आहे. अशा स्थितीत मलाही भीती वाटते. लोक किराणा सामान, भोजन आदी पोहचविण्यासाठी माझ्या घरी येतात. त्यामुळे मलाही थोडी भीती वाटते. या आजाराचा शक्य तेवढ्या लवकर बीमोड व्हावा, असे मला वाटते.’
गांगुली पुढे म्हणाले,‘क्रिकेटने मला कठीण परिस्थितीला सामोरे जाणे शिकविले. त्याचप्रमाणे प्रत्येक वेळी सावधगिरी बाळगणे आवश्यक असल्याचे समजले.’ स्वत:ला सकारात्मक ठेवण्यासाठी काय करता, याबाबत बोलताना गांगुली म्हणाले,‘क्रिकेटने मला बरेच काही शिकविले. मी वास्तविक जीवनातही अनेक आव्हानांना सामोरे गेलेलो आहो. तुम्हाला अशा स्थितीत धावा काढाव्या लागतात. कारण केवळ एक चेंडू तुम्हाला बाद करण्यास पुरेसा ठरतो.’
दरम्यान, प्रदीर्घ कालावधीनंतर कुटुंबीयांसोबत वेळ घालविण्याची संधी मिळत असल्याचे सांगताना गांगुली म्हणाले,‘लॉकडाऊला महिन्याचा कालावधी उलटला आहे. यापूर्वी मला अशी घरी राहण्याची संधी मिळत नव्हती. प्रत्येक दिवशी कामानिमित्त प्रवास करणे माझी जीवनशैली होती. गेल्या ३०-३२ दिवसापासून कुटुंबीयांसोबत घरी आहो. पत्नी, मुलगी, आई आणि भावासोबत वेळ घालवीत आहो. मला प्रदीर्घ कालावधीनंतर अशी संधी मिळाली. त्यामुळे त्याचा आनंद घेत आहो.’ ‘सध्याची परिस्थिती बघून मी खरंच दु:खी आहे. कारण याची झळ अनेकांना बसली आहे. ही महामारी कशी थोपवायची, हे अद्याप आपल्याला कळलेले नाही.- गांगुली