CWG 2022: India vs Barbados : राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत महिला क्रिकेटमध्ये उपांत्य फेरीत जाण्याचा पहिला मान ऑस्ट्रेलियाने पटकावला. साखळी गटात अपराजित राहणाऱ्या ऑस्ट्रेलियन महिला संघाने पाकिस्तानवर ४४ धावांनी विजय मिळवून उपांत्य फेरीत प्रवेश केला. पाकिस्तानची अ गटातील कामगिरी निराशाजनक राहिली आणि त्यांना गाशा गुंडाळावा लागला. अ गटातून उपांत्य फेरीच्या दुसऱ्या स्थानासाठी भारत व बार्बाडोस यांच्यात चुरस होती. त्यामुळे आता सुरू असलेल्या सामन्यात दोन्ही संघांची अवस्था करो वा मरो अशीच आहे. या सामन्यात बार्बाडोसने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. नॅशनल क्रश स्मृती मानधनाने ( Smriti Mandhana) पहिली धाव घेताच रोहित शर्माच्या ( Rohit Sharma) मोठ्या विक्रमाशी बरोबरी केली.
पहिल्या सामन्यात वर्ल्ड कप विजेत्या ऑस्ट्रेलियाने भारतावर ३ विकेट्स राखून विजय मिळवला. भारताने जोरदार पुनरागमन करून दुसऱ्या सामन्यात पाकिस्तानविरूद्ध मोठा विजय मिळवला होता. बारबाडोसच्या संघानेही पाकिस्तानला पराभवाची चव चाखवली होती. त्यामुळे भारत व बारबाडोस यांच्या खात्यात १ विजय व १ पराभव अशी नोंद होती. त्यामुळे उपांत्य फेरीत जाण्यासाठी दोघांना विजय आवश्यक आहे. स्मृती मानधना व शेफाली वर्मा यांनी भारताच्या डावाची सुरुवात केली. स्मृतीने एक धाव घेताच रोहितच्या विक्रमाशी बरोबरी केली. पण, ५ धावांवर ती LBW होऊन माघारी परतली.
भारताकडून आंतरराष्ट्रीय ट्वेंटी-२० क्रिकेटमध्ये सलामीवीर म्हणून २०००+ धावा करणारी स्मृती दुसरी खेळाडू ठरली. रोहितने सलामीवीर म्हणून २९७३ धावा केल्या आहेत, तर स्मृतीने आज २००४ धावांचा टप्पा गाठला. शिखर धवन १७५९, मिताली राज १४०७ व लोकेश राहुल १३९२ असा पुढील क्रमांक आहे. स्मृती बाद झाल्यानंतर शेफाली व जेमिमा रॉड्रीग्ज यांनी ७१ धावांची भागीदारी केली. शेफाली २६ चेंडूंत ७ चौकार व १ षटकारांसह ४३ धावांवर रन आऊट झाली. कर्णधार हरमनप्रीत कौरही ( ३) लगेच माघारी परतली अन् भारताने ९.३ षटकांत ७८ धावांत ३ विकेट्स गमावल्या.