- सुनील गावसकर
नववर्षाच्या स्वागतासाठी केनियातील ‘फिंच हॅटन्स’ रिसॉर्टवर होतो. सोबत दिग्गज वेगवान गोलंदाज मायकेल होल्डिंग होते. होल्डिंगसोबत अनेक विजयांवर चर्चा झाली. ते अनेक वर्षांपासून द. आफ्रिका क्रिकेट ‘कव्हर’ करीत आहेत. आगामी मालिका भारताच्यादृष्टीने अटीतटीची होईल, असे त्यांचे मत होते. भारतीय चाहत्यांसाठी हा दिलासा देणारा क्षण ठरावा. याआधीच्या दौºयात भारताने अनेकदा चांगली कामगिरी केली, पण मोक्याच्या क्षणी विजयापासून संघ वंचित राहिला. यंदाचा दौरा मात्र वेगळा आहे. भारतीय संघ अधिक क्षमतावान दिसतो. त्यामुळे प्रथमच मालिका जिंकून इतिहास घडविण्याची संधी असेल.
अनेकदा असे होते, की विजय हातातोंडाशी येत असताना एक घोडचूक दगाफटका करून जाते. अशा वेळी खेळाची दिशा कधी पालटेल, हे सांगणारा अनुभवी मार्गदर्शक हवा असतो. सध्याचा भारतीय संघ मात्र फलंदाजी आणि गोलंदाजीत अनुभवी असल्याने याआधीच्या चुकांची पुनरावृत्ती करणार नाही. डेल स्टेन आणि मोर्ने मॉर्केल यांच्या वेगवान माºयावर बाहेर जाणाºया चेंडूंना सलामीवीर अलगद बळी पडायचे. मागच्या दौºयात चेतेश्वर पुजाराने शतकी खेळी केली, तर वाँडरर्स कसोटीत विराट कोहलीने दोन्ही डावांत शतके ठोकण्याची किमया साधली होती. सध्या रहाणे चांगल्या फॉर्ममध्ये नसेलही, पण विदेशात खेळण्याचा रेकॉर्ड बघितल्यास तोदेखील सध्या उपयुक्त फलंदाज बनू शकतो. भारतीय गोलंदाजांना आफ्रिकेत खेळण्याचा पुरेसा अनुभव असल्याने चेंडूचा वेग आणि अचूक टप्पा कसा राखायचा, याचा वेध घेता येईल. मधूनमधून बाऊन्सरचा मारादेखील करावा लागणार आहे. भारतात मिळतात तशा खेळपट्ट्या आणि त्यावर वळण घेणारे चेंडू येथे आपल्या वाट्याला येणार नाहीत, याची जाणीव फिरकीपटूंना असेलच. त्यांनी फ्लाईट आणि अतिरिक्त उसळी घेणा-या चेंडूंचा भडीमार करायला हवा.
द. आफ्रिका घरच्या मैदानावर खेळत आहे. त्यांच्याकडे क्षमतावान खेळाडू असल्याने अंतिम ११ खेळाडू निवडण्याची मोकळीक ही संघाच्या जमेची बाजू असेल. एबी डिव्हिलियर्सचे पुनरागमन ही मोठी जमेची बाजू ठरावी. तो फलंदाजीत संघाचा नेहमीच आधार आहे. या संघात जर कुठली उण्ीाव जाणवत असेल तर ही की डीन एल्गर आणि नवखा मर्कराम यांना यंदा उच्च दर्जाच्या गोलंदाजांना तोंड देण्यात आलेले अपयश. याशिवाय वेगवान गोलंदाजी हे संघाचे मुख्य शस्त्र आहे. तथापि डावखुरा फिरकी गोलंदाज केशव महाराज याने अलीकडे सातत्याने गडी बाद केले. हे ऐकून भारतीय फिरकी गोलंदाजांना आनंद झाला असेल. अशा स्थितीत मालिकेतील चुरस शिगेला पोहोचलेली आहे. ही मालिका अत्यंत चुरशीची होणार यात शंका नाही. सामने एकदाचे कधी सुरू होतात, याचीच उत्सुकता आहे. (पीएमजी)
Web Title: D. Expectation of the competition against Africa
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.