संतोष मोरबाळे।
अहमदाबाद : दबंग दिल्लीचा कर्णधार मिराज शेख याने शेवटच्या क्षणी आपला अनुभव पणास लावत घेतलेल्या गुणांमुळे दिल्लीने तमीळ थलैव्वाला ३०-२९ अशा गुणांनी पराभूत केले. थलैव्वाकडे असणारी आघाडी कमी करत त्यांनी थरारक विजय मिळवला.
प्रो कबड्डीच्या या सत्रात दबंग दिल्ली व तमिळ थलैव्वा या दोन्ही संघांना अद्याप सूर गवसलेला नाही. आतापर्यंत त्यांना फक्त एकाच सामन्यात विजय मिळवता आला आहे. मिराज शेखच्या नेतृत्वाखालील दबंग दिल्लीने सामन्याच्या सुरुवातीपासूनच आघाडी घेण्यास प्रारंभ केला. मिराजने चांगल्या चढाया करत संघाला आघाडीवर ठेवले. थलैव्वाकडून अजय ठाकूरने ही आघाडी वाढणार नाही याची काळजी घेतली. दबंग दिल्लीकडे असणारी चार गुणांची आघाडी थलैव्वाच्या खेळाडूंनी सुपर टॅकल करत कमी केली व सामना १२-१२ असा बरोबरीत आणला.
उत्तरार्धात थलैव्वाने आघाडी वाढवण्यास सुरुवात केली. अजय ठाकूरने आपण फॉर्ममध्ये परतत असल्याचे दाखवून दिले. त्याने प्रत्येक चढाईत गुण मिळवत थलैव्वाला आघाडीवर ठेवले. दिल्लीच्या नीलेश व बाजीराव यांना पकडी करण्यात यश मिळत नव्हते.
नीलेश बहुतांश वेळ मैदानाबाहेर होता. अबोलफझलची पकड करत थलैव्वाने दिल्लीवर लोण चढवला व २२-२५ अशी तीन गुणांची आघाडी मिळवली.
उत्तरार्धात दोन्ही संघांनी तुल्यबळ खेळ केला. शेवटच्या काही मिनिटात चार गुणांनी पिछाडीवर असताना मिराजने नियोजनबद्ध खेळ करत ही आघाडी कमी केली. मिराजने सुपर रेडद्वारे तीन गुण घेत ३०-२९ अशा गुणांनी सामना जिंकला. शेवटच्या क्षणी केलेल्या चुकीमुळे थलैव्वाला पराभूत व्हावे लागले.
।गुजरात -बंगाल सामना बरोबरीत
घरच्या मैदानावर सर्व सामने जिंकण्याचे गुजरात फॉर्च्युन जायंट्सचे मनसुबे बंगाल वॉरियर्सने उधळले. शेवटच्या क्षणापर्यंत रंगलेला हा सामना २६-२६ असा बरोबरीत सुटला. गुजरातवर पूर्वार्धातच बंगालने लोण चढवत चार गुणांची आघाडी घेतली. बंगालच्या खेळाडूंनी सांघिक खेळाचे प्रदर्शन केले. सुरजित, मनिंदर व दीपक नरवाल यांनी चांगला खेळ केला. उत्तरार्धात पिछाडीवर पडलेल्या गुजरातला सुकेश हेगडे व सचिन यांनी आपल्या कौशल्याने आघाडी मिळवून दिली. शेवटची काही मिनिटे शिल्लक असताना महेंद्र राजपूत याने तीन गडी बाद करत बंगालवर लोण चढवले.
२१-२३ अशा पिछाडीवरील गुजरातला यामुळे २६-२३ अशी तीन गुणांची आघाडी मिळाली. मात्र त्यानंतर लगेचच दीपकने दोन चढायातून हा सामना २६-२६ असा बरोबरीत सोडवला.
Web Title: Dabang Delhi has won
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.