विराट कोहलीच्या पत्रकार परिषदेनंतर BCCIला रोषाला सामोरे जावे लागत आहे. त्यात बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली ( Sourav Ganguly) यालाही खोटं पाडल्यानं एकच खळबळ उडाली. 2017मध्ये वन डे संघाचा कर्णधार बनलेल्या विराटकडून 90 मिनिटांच्या संभाषणात निवड समितीनं हे पद काढून घेतल्याचा दावा, त्या पत्रकार परिषदेत करण्यात आला. शिवाय ट्वेंटी-20 कर्णधारपदावरून पायऊतार होताना BCCIच्या कोणत्याही पदाधिकाऱ्यानं हा निर्णय घेऊ नकोस अशी विनंती न केल्याचेही विराटनं स्पष्ट केले. पण, त्याच्या या विधानानं सौरव गांगुलीला चपराक बसली. दोनच दिवसांपूर्वी गांगुलीनं मी स्वतः विराटला ट्वेंटी-20 कर्णधारपद सोडू नको अशी विनंती केली होती असे सांगितले होते.
'कसोटी संघ निवडण्याआधी निवड समितीची बैठक होण्यापूर्वी मला दीड तास आधी कॉल आला. निवड समिती प्रमुखांनी कसोटी संघाबाबत माझ्याशी चर्चा केली. तो कॉल संपण्यापूर्वी निवड समितीनं मला वन डे कर्णधारपदावर तू नसशील असे सांगितले आणि मी त्यांचा निर्णय मान्य केला. त्याआधी या विषयावर चर्चा झाली नाही. मला कोणीही ट्वेंटी-२० संघाचे कर्णधारपद सोडू नकोस, अशी विनंती केलेली नाही. BCCI कडून या निर्णयाबाबत माझ्याशी कुणीच चर्चा केली नाही . माझा निर्णय त्यांनी मान्य केला आणि हा काही गुन्हा नाही,''असे विराट म्हणाला होता.
त्यावर बीसीसआयनं अजून कोणतीच प्रतिक्रिया दिली नाही. पण, CNNnews18 दिलेल्या वृत्तानुसार सौरव गांगुली म्हणाला,''माझ्याकडे या प्रकरणावर बोलण्यासारखे काहीच नाही. जे मी आधीच बोललोय. BCCI हे प्रकरण योग्यरितिनं हाताळेल.''
त्यात ता दिल्ली कॅपिटल्स संघाचे सहमालक पार्थ जिंदाल हे गांगुलीच्या बचावासाठी मैदानावर उतरले आहेत. त्यांनी ट्विट केलं की,''दादाची विश्वासार्हता निर्विवादीत आहे आणि त्याच्या विरोधात काही बोलण्यापूर्वी एक गोष्ट नीट समजून घ्या की त्यानं भारतीय क्रिकेटसाठी काय केलंय आणि भारतीय क्रिकेटच्या भल्यासाठी तो कोणतीच तडजोड खपवून घेणार नाही. आशा करतो की हा वाद लवकर संपावा, त्यातून भारतीय क्रिकेटचाच पराभव होणार आहे.''