Join us

क्रिकेट जगतात 'फास्टर-स्पिनर'ची चर्चा; यॉर्कर लेंथ चेंडूवर घेतली कारकिर्दीतील पहिली विकेट

हा गोलंदाज आहे स्पिनर पण तो ज्या वेगाने चेंडू टाकतो ते पाहून व्हाल थक्क

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 12, 2024 17:44 IST

Open in App

क्रिकेटच्या मैदानात अनेकदा गोलंदाज आपल्या खास शैलीनं लक्षवेधून घेतात. गोलंदाज म्हटलं की, प्रामुख्यानं फिरकीपटू आणि जलदगती गोलंदाज असं चित्र डोळ्यासमोर येते. पण या दोन्हीचा कॉम्बो पॅक असणारा एक गोलंदाज सध्या चर्चेत आहे. साध्या सोप्या भाषेत सांगायचं तर हा गोलंदाज आहे स्पिनर पण तो ज्या वेगाने चेंडू टाकतो ते पाहून हा स्पिनर आहे की फास्टर? असा प्रश्न तुम्हाला पडू शकतो. आपल्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतील पहिली विकेटही या फिरकीपटूनं जबरदस्त यॉर्कर लेंथ चेंडूवर घेतली आहे. तो सध्या 'फास्टर-स्पिनर'च्या रुपात चर्चेत आहे.

कोण आहे तो वेगाने चेंडू फेकण्याची क्षमता असणारा फिरकीपटू?

क्रिकेट जगतात सध्या ज्या नव्या गोलंदाजाची चर्चा सुरुये तो इंग्लंडच्या संघातील आहे. वेस्ट इंडिज विरुद्धच्या मालिकेतून त्याने आंतरारष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले आहे. तो खेळाडू दुसरा तिसरा कोणी नसून तो आहे डॅन मौसली. गोलंदाजीतील खासियत त्याला क्रिकेटमध्ये एक वेगळ्या उंचीवर घेऊन जाणारी ठरू शकते. एवढेच नाही तर हा खेळाडू भविष्यात इंग्लंडसाठी ट्रम्प कार्डही ठरू शकतो.

तो १०० kmph पेक्षा अधिक वेगानं टाकतो चेंडू 

क्रिकेटच्या मैदानात फिरकीपटू गोलंदाज फारच कमी वेळा १०० kmph वेगाने चेंडू फेकताना पाहायला मिळते. पण ईएसपीन क्रिकइन्फोनं दिलेल्या माहितीनुसार, डॅन मौसली हा १०९.४ kmph एवढ्या गतीने गोलंदाजी केलीये. ही गती या फिरकीपटूला जलद  गतीने चेंडू टाकणारा क्रिकेट जगतातील फिरकीपटू असा टॅग लावणारी आहे. त्यात आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील पहिली विकेट त्यानं यॉर्कर लेंथवरील चेंडूवर घेतली. वेस्ट इंडिजचा पॉवर हिटर रावमन पॉवेल याला डॅन याने क्लीन बोल्ड केल्याचे पाहायला मिळाले. डॅन याने टाकलेल्या या चेंडूचा वेग जवळपास ११६.७ kmph इतका होता.

नाविन्य दाखवून देणार नवा गडी वलय निर्माण करणार का?

डॅन मौसली यानं वेस्ट इंडिज विरुद्धच्या वनडे मालिकेतून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले. याच दौऱ्यात त्याला टी-२० पदार्पणाचीही संधी मिळाली. टी-२० मालिकेतील पहिल्या सामन्यात त्याने फक्त एक ओव्हर टाकली. ज्यात त्याला विकेट काही मिळाली नव्हती. पण दुसऱ्या सामन्यात त्याने २ विकेट्स घेत लक्षवेधून घेतले. गोलंदाजीतील या नाविन्यासह क्रिकेट जगतात एक वेगळ वलय निर्माण करण्यात यशस्वी ठरणार का? ते पाहण्याजोगे असेल. 

टॅग्स :टी-20 क्रिकेटइंग्लंडवेस्ट इंडिज