भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका पहिल्या कसोटीत रोहित शर्मानं प्रथमच सलामीला येताना विक्रमांचा पाऊस पाडला. सलामीवीर म्हणून पहिल्याच कसोटी सामन्यात दोन्ही डावांत शतकी खेळी करणारा तो पहिला भारतीय फलंदाज ठरला. भारताने तीन कसोटी सामन्यांच्या मालिकेची सुरुवात दणक्यात केली आणि आफ्रिकेवर 203 धावांनी विजय मिळवला. रोहितला मॅन ऑफ दी मॅचच्या पुरस्काराने गौरविण्यात आले. इंग्लंडची महिला क्रिकेटपटू डॅनिएल वॅटनेही रोहितच्या खेळीचे कौतुक केले.
लोकेश राहुलला डच्चू दिल्यानंतर रोहितला कसोटीत प्रथमच सलामीला खेळण्याची संधी मिळाली. त्याचं सोनं करताना रोहितनं दोन्ही डावांत शतक ठोकलं. त्यानं पहिल्या डावात 176 धावा चोपल्या आणि मयांक अग्रवालसह 317 धावांची विक्रमी भागीदारी केली. त्यांच्या खेळीच्या जोरावर भारताने 502 धावांचा डोंगर उभा केला. प्रत्युत्तरात आफ्रिकेनं डीन एल्गर व क्विंटन डी कॉकच्या शतकाच्या जोरावर 431 धावा केल्या. भारताने पहिल्या डावात 71 धावांची आघाडी केली. रोहित शर्मानं दुसऱ्या डावात 127 धावा केल्या. त्याला चेतेश्वर पुजारानं 81 धावा करून उत्तम साथ दिली. भारतानं आफ्रिकेसमोर 395 धावांचे लक्ष्य ठेवले. आफ्रिकेचा डाव 191 धावांत गुंडाळला. रोहितच्या खेळीचे कौतुक करताना वॅटने इंस्टाग्रामवर रोहितचा स्टेटस ठेवला... त्यावर तिनं रोहितचं कौतुक केलं. रोहितनं या कसोटीत 303 धावा केल्या.
रोहित शर्माने द. आफ्रिकेचे वाजवले तीन'तेरा'; वासिम अक्रमचा २३ वर्षं जुना विक्रम मोडला!
रोहितने दोन्ही डावांत मिळून एकूण 303 धावा केल्या आणि त्यात 33 चौकार व 13 षटकारांचा समावेश आहे. एकाच कसोटीत सर्वाधिक षटकार मारणारा तो जगातील एकमेव फलंदाज आहे. ही विक्रमी कामगिरी करताना त्यानं पाकिस्तानच्या वासीम अक्रमचा 1996 सालचा विक्रम मोडला. अक्रमने झिम्बाब्वेविरुद्ध 12 षटकार खेचले होते. मॅथ्यू हेडन, नॅथन अॅस्टेल, ब्रेंडन मॅकलम ( दोन वेळा) आणि बेन स्टोक्स यांनी एका कसोटीत 11 षटकार खेचले आहेत.