नवी दिल्ली : अलीकडेच ऑस्ट्रेलियाच्या धरतीवर ट्वेंटी-२० विश्वचषक पार पडला. पुढच्या वर्षी अर्थात २०२३ चा वनडे विश्वचषक भारतात होणार आहे. या मोठ्या स्पर्धेच्या आधीच भारत आणि पाकिस्तान यांच्या क्रिकेट बोर्डामध्ये वाद सुरू झाला आहे. विश्वचषकाच्या आधी आशियाई संघटनेचे अध्यक्ष आणि बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनी भारतीय संघ पाकिस्तानात जाणार नसल्याचे स्पष्ट केले होते. आगामी आशिया चषकाची स्पर्धा पाकिस्तानात होणार आहे. सुरक्षेच्या मुद्द्यावर बीसीसीआयने ही स्पर्धा तटस्थ ठिकाणी खेळवण्याची मागणी केली आहे.
बीसीसीआयच्या या मागणीवरून पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने देखील लांबलचक पत्रक काढून भारतावर निशाणा साधला होता. याशिवाय भारतात होणाऱ्या वनडे विश्वचषकावर पाकिस्तान बहिष्कार टाकेल अशी धमकी देखील पीसीबीने दिली होती. अशातच आता पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे अक्ष्यक्ष रमीझ राझा यांनी आणखी एक वादग्रस्त विधान केले आहे. जर पाकिस्तान पुढच्या वर्षी भारतात होणार्या विश्वचषकात सहभागी झाला नाही, तर ते कोण पाहणार? असे रमीझ राजा यांनी म्हटले आहे.
पाकिस्तानच्या माजी खेळाडूचा घरचा आहेर यावर आता पाकिस्तानचा माजी खेळाडू दानेश कानेरियाने त्याच्या यूट्यूब चॅनेलवरून बोलताना एक मोठे वक्तव्य केले आहे. कानेरियाने पाकिस्तान क्रिकेट बोर्डाला घरचा आहेर देताना म्हटले, "पीसीबीमध्ये आयसीसीच्या कोणत्याही कार्यक्रमावर बहिष्कार टाकण्याची हिंमत नाही. दुसरीकडे पाकिस्तान विश्वचषकासाठी आला नाही तर भारताला याची काहीच चिंता नसेल. त्यांच्याकडे खूप मोठी बाजारपेठ आहे ज्यामुळे भरपूर महसूल मिळतो. विश्वचषकासाठी भारतात न जाण्याचा निर्णय पाकिस्तानला खूप महागात पडेल."
पाकिस्तान विश्वचषकासाठी भारतात नक्कीच जाणार आहे, आयसीसीचा दबाव असल्याने त्यांच्याकडे दुसरा पर्याय नव्हता, असे अधिकारी स्पष्टीकरण देतील. आयसीसीचा कोणताही कार्यक्रम वगळण्याबाबत ते वारंवार बोलत असतील तर त्यामुळे पाकिस्तान क्रिकेटचे मोठे नुकसान होईल. अशा शब्दांत कानेरियाने रमीझ राजा यांच्या वक्तव्याचा समाचार घेतला.
"इतर देशही पाकिस्तानात यायला नकार देऊ शकतात" "आयसीसीच्या कोणत्याही स्पर्धेवर बहिष्कार टाकण्याची हिंमत पाकिस्तान क्रिकेट बोर्डामध्ये नाही. आशिया चषकासाठी आणखी बराच वेळ आहे. तोपर्यंत देशात सर्व काही ठीक होईल की नाही किंवा ही स्पर्धा पाकिस्तानच्या धरतीवर होईल की नाही याची आम्हाला खात्री नाही. असे पण होऊ शकते की भारताव्यतिरिक्त बांगलादेश आणि अफगाणिस्तानसारखे संघही पाकिस्तानचा दौरा करण्यास नकार देऊ शकतात. आशिया चषक आपल्या देशात खेळवला जावा अशी पाकिस्तानच्या जनतेची इच्छा आहे. मात्र देशातील परिस्थिती पाहता त्यांना बॅकफूटवर यावे लागेल." असे कानेरियाने अधिक म्हटले.
२०२३ मध्ये होणाऱ्या प्रमुख स्पर्धा
- - आयसीसी महिला ट्वेंटी-२० वर्ल्ड कप, दक्षिण आफ्रिका
- - आयसीसी १९ वर्षांखालील मुलींची ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धा, दक्षिण आफ्रिका
- - आशिया चषक २०२३, पाकिस्तान
- - आयसीसी क्रिकेट वन डे वर्ल्ड कप, भारत
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"