नवी दिल्ली : पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने न्यूझीलंडविरूद्धच्या कसोटी मालिकेपूर्वी एक मोठा निर्णय घेतला. अलीकडेच पार पडलेल्या इंग्लंडविरूद्धच्या मालिकेत झालेल्या पराभवानंतर पीसीबीने संघाचा माजी खेळाडू शाहिद आफ्रिदीवर मोठी जबाबदारी सोपवली. खरं तर शाहिद आफ्रिदीची पाकिस्तान राष्ट्रीय निवड समितीचे अंतरिम अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. यावरूनच आता पाकिस्तानच्या माजी खेळाडूने त्याची खिल्ली उडवली आहे.
दरम्यान, पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने शनिवारी आफ्रिदीची अध्यक्ष म्हणून निवड केली. पीसीबी व्यवस्थापन समितीने पाकिस्तानचा माजी कर्णधार शाहिद आफ्रिदीची राष्ट्रीय निवड समितीचे अंतरिम अध्यक्ष म्हणून नियुक्ती केली आहे. तसेच, या समितीमध्ये अब्दुल रज्जाक आणि राव इफ्तिखार अंजुम यांचा समावेश आहे. याशिवाय, हारुण रशीद हे संयोजक म्हणून असणार आहेत. अशी माहितीही पीसीबीने दिली.
दानेश कानेरियाने उडवली खिल्ली शाहिद आफ्रिदीची अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर संघाचा माजी खेळाडू दिनेश कानेरियाने ट्विटच्या माध्यमातून त्याची खिल्ली उडवली आहे. त्याने पोस्ट केलेल्या फोटोमध्ये आफ्रिदी चेंडू कुरतडत असल्याचा पाहायला मिळत आहे. मात्र, मोठी जबाबदारी मिळाल्यानंतर आफ्रिदीने न्यूझीलंडविरूद्धच्या मालिकेत नवख्या खेळाडूंना संधी दिली आहे.
संघ जाहीर केल्यानंतर त्याने म्हटले, "आम्ही संघावर चांगली चर्चा केली आणि एकमत झाले की सामन्यात 20 बळी घेण्याची सर्वोत्तम संधी देण्यासाठी आम्हाला आमचा गोलंदाजी विभाग मजबूत करणे आवश्यक आहे. अलीकडील फॉर्म आणि कामगिरी लक्षात घेऊन आम्ही वेगवान गोलंदाजांचा समावेश केला आहे. संघात मीर हमजा आणि शाहनवाज दहानी आणि ऑफस्पिनर साजिद खान यांना संधी मिळाली आहे."
न्यूझीलंडविरूद्धच्या मालिकेसाठी पाकिस्तानी संघ - बाबर आझम (कर्णधार), अब्दुला शफीक, अबरार अहमद, हसन अली, इमाम उल हक, कामरान गुलाम, मीर हमजा, मोहम्मद नवाज, मोहम्मद रिझवान, मोहम्मद वसीम ज्युनिअर, नसीम शाह, नोमान अली, साजिद खान, सलमान अली आगा, सरफराज अहमद, सऊद शकील, शाहनवाज दहानी, शान मसूद आणि जाहिद महमूद.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"