इस्लामाबाद - पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज शोएब अख्तरने माजी क्रिकेटपटू दानिश कनेरियावर झालेल्या अन्यायाबाबत धक्कादायक गौप्यस्फोट केला होता. कनेरिया हिंदू असल्याने इतर खेळाडू त्याच्यासोबत गैरवर्तन करत.त्याच्यासोबत काही खात नसत, असे अख्तरने म्हटले होते. त्यानंतर पाकिस्तानचा माजी क्रिकेपटू असलेल्या कनेरियाने त्यावर प्रतिक्रिया दिली आहे. तसेच शोएब अख्तरने जे सांगितले ते खरे आहे, असे तो म्हणाला.
एएनआयला दिलेल्या मुलाखतीत कनेरियाने सांगितले की, 'शोएब अख्तरने जे काही सांगितले ते खरे आहे. मी हिंदू असल्याने जे खेळाडू माझ्यासोबत काही खातपित नसत अशा खेळाडूंची नावे मी जाहीर करणार आहे. हे वास्तव सर्वांसमोर आणण्याची हिंमत माझ्यामध्ये नव्हती. मात्र आता मी गप्प बसणार नाही.''
पाकिस्तानच्या क्रिकेट संघातही हिंदू खेळाडूंवर अन्याय केला गेल्याचा मोठा गौप्यस्फोट अख्तरने केला होता. त्यासाठी त्याने दानिश कनेरियाचे उदाहरण दिले होते. हिंदू क्रिकेटपटूबाबत अख्तर म्हणाला की, " पाकिस्तानच्या संघात हिंदू खेळाडूही होता. तो हिंदू आहे म्हणून त्याच्यावर कायम अन्याय करण्यात आला. त्याने संघाल बऱ्याच विकेट्स मिळवून दिल्या. सामने आणि मालिकाही जिंकवून दिल्या, पण तरीही त्याला आपल्याबरोबर जेवताना पाहून पाकिस्तानच्या खेळाडूंची आग मस्तकात जायची. त्या हिंदू खेळाडूला मारण्यापर्यंतही त्यांची मजल गेली होती. अखेर त्या हिंदू खेळाडूची कारकिर्द अल्पावधीतच आटोपली, नाहीतर त्याने जास्त काळ संघाची सेवा केली असती. हा हिंदू खेळाडू होता दानिश कनेरिया."
अख्तरने 'गेम ऑन है' या टीव्ही शो मध्ये ही गोष्ट सांगितली. यावेळी पाकिस्तानचे काही माजी क्रिकेटपटूही कार्यक्रमात उपस्थित होते. यावेळी अख्तर म्हणाला की, " पाकिस्तानच्या संघात बरेच हेवेदावे केले जातात. पाकिस्तानच्या संघात गुणवत्ता आणि कामगिरी या गोष्टींपेक्षाही काही गोष्टी महत्वाचा ठरतात. या गोष्टींसाठी पाकिस्तानचे खेळाडू हाणामारी करायलाही तयार असतात."
अख्तर पुढे म्हणाला की, " पाकिस्तानच्या संघात जे खेळाडू गैर मुस्लीम होते, त्यांच्यावर अन्याय केला गेला. युसूफ योहाना हा इसाई धर्माचा होता. तो देवाची देणगीच होता. पण ही देणगी पाकिस्तानच्या संघाला चांगल्यापद्धतीने सांभाळता आली नाही. त्यालाही पाकिस्तानचे खेळाडू त्रास द्यायचे. अखेर योहानाला मुस्लीम धर्माचा स्वीकार करावा लागला."
Web Title: Danish Kaneria reacts to Shoaib Akhtar's statement
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.