वेस्ट इंडिज संघाला दोन ट्वेंटी-20 वर्ल्ड कप जिंकून देणाऱ्या माजी कर्णधार डॅरेन सॅमीनं काही दिवसांपूर्वी पाकिस्तानच्या नागरिकत्वासाठी अर्ज केला होता. पाकिस्तान सूपर लीगमध्ये सॅमी पेशावर झाल्मी संघाचे प्रतिनिधित्व करत आहे आणि त्याने पाकिस्तानचे गोडवे गायले होते. तो पाकिस्तानचा नागरिक होण्यास उत्सुक असल्याची चर्चाही रंगली होती आणि झाल्मी संघाच्या मालकांनी त्याला दुजोराही दिला होता. आता सॅमीला पाकिस्तानी संघाचे प्रशिक्षकपदच देण्यात आले आहे. त्यामुळे आगामी काही काळात सॅमी पाकिस्तानी नागरिक झाल्यास आश्चर्य वाटायला नको.
पाकिस्तान सूपर लीगसाठी पाकिस्तानमध्ये दाखल होणारा सॅमी हा पहिला परदेशी खेळाडू आहे. सॅमीच्या नेतृत्वाखाली वेस्ट इंडिजनं 2012 आणि 2016मध्ये पुरुष ट्वेंटी-20 वर्ल्ड कप जिंकला होता. 2017पासून तो आंतरराष्ट्रीय ट्वेंटी-20 क्रिकेटपासून दूर आहे. त्यानं 68 ट्वेंटी-20 सामन्यांत 587 धावा आणि 44 विकेट्स घेतल्या आहेत. त्याच्या नावावर 38 कसोटी आणि 126 वन डे सामनेही आहेत.
पाकिस्तान सूपर लीगमध्ये पेशावर झाल्मी संघ त्याच्या नेतृत्वाखाली खेळला. पण, लीगच्या मध्यांतरालाच सॅमीकडून कर्णधारपदाची जबाबदारी काढून घेण्याचा निर्णय झाला आहे. सॅमीनं 2017मध्ये पेशावर झाल्मी संघाला पाकिस्तान सूपर लीगचे जेतेपदही पटकावून दिले होते. पण, यंदा त्यांना साजेशी कामगिरी करता आलेली नाही. त्यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे.
पण, असे करताना सॅमीला बढती देण्यात आली आहे. त्याच्याकडे संघाच्या प्रशिक्षकाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. वाहब रियाझ हा झाल्मी संघाचा नवा कर्णधार असणार आहे. आतापर्यंत मुख्य प्रशिक्षक असलेल्या मोहम्मद अक्रमकडे डायरेक्टर ऑफ क्रिकेट आणि गोलंदाज प्रशिक्षक ही जबाबदारी असेल. मुख्य प्रशिक्षकपद आले असले तरी सॅमी संघाकडून खेळणार आहे. पुढील दोन वर्ष तो खेळाडू कम प्रशिक्षक अशा दुहेरी भूमिकेत असणार आहे.