सिडनी- Ball - tempering प्रकरणामुळे ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघाला मोठा धक्का बसला. या प्रकरणात दोषी आढळलेले स्टीव स्मिथ, डेव्हिड वॉर्नर आणि कॅमेरून बँक्रॉफ्ट या तीन खेळाडूंना शिक्षा झाली. स्मिथ व वॉर्नर यांच्यावर १२ महिन्यांची, तर बँक्रॉफ्टला ९ महिने बंदीची शिक्षा झाली.
त्यावेळी ऑस्ट्रेलियाच्या प्रशिक्षकपदी असलेल्या डॅरेन लेहमन यांच्याकडेही संशयाच्या नजरेने पाहिले गेले. मात्र क्रिकेट ऑस्ट्रेलियाने त्यांची निर्दोष मुक्तता केली. या प्रकरणात लेहमन यांचा संबंध नसल्याचे तपासाअंती सांगण्यात आले. तरीही लेहमन यांनी नैतिक जबाबदारी घेत प्रशिक्षकपदाचा राजीनामा दिला. सहा आठवड्यानंतर क्रिकेट ऑस्ट्रेलियाने त्यांची नियुक्ती ऑस्ट्रेलिया नॅशनल परफॉर्मन्स प्रोग्रामच्या साहाय्यक प्रशिक्षकपदी केली. ऑक्टोबरपर्यंत ते हा पदभार सांभाळणार आहेत.
त्यानंतर लेहमन आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये नव्या भूमिकेत परतणार आहेत. मॅक्यूरी स्पोर्ट्स रेडिओच्या समर ऑफ क्रिकेट या कार्यक्रमात ते समालोचन करणार आहेत. या रेडिओस्टेशननने या वृत्ताला ट्विटरच्या माध्यमातून दुजोरा दिला आहे.