Join us  

विंडीजचा वर्ल्ड कप विजेता खेळाडू होणार पाकिस्तानी? नागरिकत्वासाठी अर्ज

पाकिस्तान सूपर लीगच्या ( पीसीबी) पाचव्या हंगामाला नुकतीच सुरुवात झाली. गतविजेता क्वेट्टा ग्लॅडीएटर यांनी पहिल्याच सामन्यात दोन वेळा जेतेपद पटकावणाऱ्या इस्लामाबाद युनायटेडवर विजय मिळवला.

By ऑनलाइन लोकमत | Published: February 22, 2020 9:19 AM

Open in App

पाकिस्तान सूपर लीगच्या ( पीसीबी) पाचव्या हंगामाला नुकतीच सुरुवात झाली. गतविजेता क्वेट्टा ग्लॅडीएटर यांनी पहिल्याच सामन्यात दोन वेळा जेतेपद पटकावणाऱ्या इस्लामाबाद युनायटेडवर विजय मिळवला. पाकिस्तान सूपर लीग प्रथमच पूर्णपणे पाकिस्तानमध्ये खेळवली जात आहे आणि जवळपास 36 परदेशी खेळाडू येथे दाखल झाले आहेत. श्रीलंका आणि बांगलादेश यांच्या पाकिस्तान दौऱ्यानंतर येथील सुरक्षा यंत्रणेवर विश्वास बसल्यामुळे पाकिस्तान सूपर लीग यंदा पूर्णपणे पाकिस्तानमध्येच खेळवण्याचा निर्णय घेण्यात आला. पण, ही लीग सध्या एका वेगळ्या कारणामुळे चर्चेत आली आहे.

वेस्ट इंडिज संघाला दोन ट्वेंटी-20 वर्ल्ड कप जिंकून देणारा कर्णधार डॅरेन सॅमीमुळे सध्या पाकिस्तान सूपर लीगची चर्चा रंगत आहे. डॅरेन सॅमीला पाकिस्तानचं नागरिकत्व मिळावं म्हणून पाकिस्तान सूपर लीगमध्ये तो प्रतिनिधित्व करत असेल्या पेशावर झाल्मी संघाकडून अर्ज करण्यात आला आहे. डॅरेन पाकिस्तान सूपर लीगमध्ये पेशावर झाल्मी संघाचे प्रतिनिधित्व करत आहे. पेशावर झाल्मी संघाचे मालक जावेद आफ्रिदी यांनी सॅमीला पाकिस्तानी नागरिकत्व मिळावं यासाठी अर्ज केल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे.

ते म्हणाले,''डॅरेन सॅमीला पाकिस्तानचे नागरिकत्व मिळावं, यासाठी आम्ही विनंती करत आहोत. त्यासाठीचा अर्ज सध्या राष्ट्रपतींकडे पाठवण्यात आला आहे. तसेच पाकिस्तान क्रिकेट मंडळाच्या अध्यक्षानीही यासाठी आपला शब्द टाकावा, अशी विनंती मी त्यांना करतो. पाकिस्तान सुपर लीगच्या दुसऱ्या मोसमात लाहोर येथे सॅमीनं या देशाप्रती प्रेम व्यक्त केलं होतं.''

पाकिस्तान सूपर लीगसाठी पाकिस्तानमध्ये दाखल होणारा सॅमी हा पहिला परदेशी खेळाडू आहे. सॅमीच्या नेतृत्वाखाली वेस्ट इंडिजनं 2012 आणि 2016मध्ये पुरुष ट्वेंटी-20 वर्ल्ड कप जिंकला होता. 2017पासून तो आंतरराष्ट्रीय ट्वेंटी-20 क्रिकेटपासून दूर आहे. त्यानं 68 ट्वेंटी-20 सामन्यांत 587 धावा आणि 44 विकेट्स घेतल्या आहेत. त्याच्या नावावर 38 कसोटी आणि 126 वन डे सामनेही आहेत.  

टॅग्स :वेस्ट इंडिजपाकिस्तान