लंडन : इंग्लंड-न्यूझीलंड यांच्यात लॉर्ड्सवर खेळली जात असलेली पहिली कसोटी दुसऱ्याच दिवशी रोमहर्षक अवस्थेत पोहोचली.
इंग्लंडनेन्यूझीलंडच्या पहिल्या डावातील १३२ धावांच्या मोबदल्यात शुक्रवारी केवळ १४१ धावा केल्यामुळे त्यांना नऊ धावांची निसटती आघाडी घेता आली. यानंतर डेरिल मिशेल आणि टॉम ब्लंडेल यांनी अर्धशतकी खेळी करीत न्यूझीलंडला दुसऱ्या डावात सावरले. या दोघांनी पाचव्या गड्यासाठी नाबाद शतकी भागीदारी करीत इंग्लंडला कोणतीही संधी दिली नाही. न्यूझीलंडने ५० षटकात ४ बाद १५०अशी वाटचाल केली. मिशेल ६० तर ब्लंडेल ५२ धावांवर खेळत आहे.
त्याआधी यजमान इंग्लंडने आठ फलंदाज ४९ धावांत गमावताच त्यांचा पहिला डाव १४१ धावात संपला. जॅक क्राऊलीने सर्वाधिक ४३ आणि सलामीवीर ॲलेक्स लीस याने २५ धावा केल्या. न्यूझीलंडकडून टिम साऊदीने चार, ट्रेंट बोल्ट तीन आणि काइल जेमिसनने दोन गडी बाद केले. अष्टपैलू कॉलिन डी ग्रॅन्डहोमे याने एक बळी घेतला. न्यूझीलंडला गुंडाळल्यानंतर इंग्लंडने चांगली सुरुवात केली होती. क्राऊली- लीस यांनी सलामीला ५९ धावा केल्या. क्राऊली बाद होताच इंग्लंडची फलंदाजी कोसळली.
न्यूझीलंड पहिला डाव : सर्वबाद ४० षटकात सर्वबाद १३२ धावा, इंग्लंड पहिला डाव : ४२.५ षटकात सर्वबाद १४१ धावा (ॲलेक्स लीस २५, जॅक क्राऊली ४३, ज्यो रुट ११) गोलंदाजी : टीम साऊदी ४/ ५५, ट्रेंट बोल्ट ३/२१, काइल जेमिसन २/२०. न्यूझीलंड दुसरा डाव : ५० षटकात ४ बाद १५०धावा (टॉम ब्लंडेल खेळत आहे ५२, डेरिल मिशेल खेळत आहे ५०,टॉम लॅथम १४, केन विल्यमसन १५, डेवोन कॉनवे १३) गोलंदाजी : मॅथ्यू पॉट्स २/४१, जेम्स ॲन्डरसन १/३६, स्टुअर्ट ब्रॉड १/२८.
शेन वॉर्नला अनोखी श्रद्धांजली
या सामन्याचा पहिला दिवस ऑस्ट्रेलियन क्रिकेटच्या कायम स्मरणात राहील. दिवंगत दिग्गज ऑस्ट्रेलियन फिरकी गोलंदाज शेन वॉर्नला अनोख्या पद्धतीने श्रद्धांजली वाहण्यात आली. इंग्लंड क्रिकेट मंडळाने (ईसीबी) मोठा निर्णय घेत ऐतिहासिक क्रिकेट मैदान लॉर्ड्सच्या समालोचन कक्षाचे नाव बदलले आहे. लॉर्ड्समधील समालोचन कक्षाला पूर्वी ‘स्काय समालोचन कक्ष’ असे म्हटले जात होते. पण, कालपासून आता हा कक्ष शेन वॉर्नच्या नावाने ओळखला जाईल. शिवाय कक्षाच्या भिंतींवर शेन वॉर्नची कायमस्वरूपी राहतील अशी छायाचित्रेही लावण्यात आली आहेत.
न्यूझीलंडच्या डावाची २३ षटके संपल्यानंतर सामना २३ सेकंदांसाठी थांबवण्यात आला. स्क्रीनवर शेन वॉर्नची चित्रफीत दाखवण्यात आली. यावेळी सर्व खेळाडूंनी आणि प्रेक्षकांनी उभे राहून टाळ्या वाजवल्या. शेन वॉर्न २३ क्रमांकाची जर्सी घालत असे. त्यामुळे सामना २३ षटकांनंतर थांबवण्यात आला आणि २३ सेकंद टाळ्यांचा कडकडाट झाला. यंदा ४ मार्च रोजी थायलंडमध्ये शेन वॉर्नचे आकस्मिक निधन झाले.
Web Title: Daryl Mitchell and Blundell recovered of NZ Innings; Both of them scored half-centuries after trailing England by 9 runs
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.