न्यूझीलंड संघाचा कर्णधार केन विलियम्सननं ( Kane Williamson) लिडर कसा असावा याची प्रचिती दिली. संघ अडचणीत असताना त्यानं संघाला केवळ सावरलेच नाही, तर सहकाऱ्याच्या पाठीवर विश्वासाची थाप मारून संघाला मोठी आघाडी उभारून दिली. केननं २०२१ वर्षात पहिल्या शतकाचा, द्विशतकाचा मान पटकावला. सातत्यपूर्ण कामगिरी करताना केननं दुसऱ्या कसोटीत पाकिस्तानी गोलंदाजांना हतबल केले. पाकिस्तानच्या पहिल्या डावातील २९७ धावांच्या उत्तरात न्यूझीलंडचे ३ फलंदाज ७१ धावांत तंबूत परतले होते. पण, केन आणि हेन्री निकोल्स यांनी चौथ्या विकेटसाठी ३६९ धावांची भागीदारी करून पाकिस्तानी गोलंदाजांच्या चिंधड्या उडवल्या.
अझर अली ( ९३) आणि कर्णधार मोहम्मद रिझवान ( ६१) यांच्या अर्धशतकांच्या जोरावर पाकिस्ताननं पहिल्या डावात २९७ धावा केल्या. न्यूझीलंडच्या कायले जेमिन्सननं ६९ धावांत ५ विकेट घेतल्या. प्रत्युत्तरात न्यूझीलंडचे तीन फलंदाज ७१ धावांवर माघारी परतले होते. पण, विलियम्सन व निकोल्स यांनी पाकिस्तानी संघाची हवाच काढली. दोघांनी चौथ्या विकेटसाठी अफलातून फलंदाजी केली. त्यांच्या ३६९ धावांच्या भागीदारीमुळे संघानं ५०० धावांचा पल्ला ओलांडला.
निकोल्स २९१ चेंडूंत १८ चौकार व १ षटकार मारून १५७ धावांवर माघारी परतला. दुसरीकडे विलियम्सन खेळपट्टीवर नांगर रोवून उभाच होता. विलियम्सननं ३६४ चेंडूंत २८ चौकारांसह २३८ धावा केल्या. त्यानंतर आलेल्या डॅरील मिचेलच्या शतकासाठी विलियम्सननं डाव घोषित करण्याचा निर्णय लांबणीवर टाकला. मिचेल ८२ धावांवर असताना विलियम्सननं त्याला एक षटक आहे, असा इशारा केला. पण, मिचेलच्या पहिल्या कसोटी शतकासाठी तो ३ षटकं थांबला. मिचेलनं ११२ चेंडूंत ८ चौकार व २ षटकारांसह नाबाद १०२ धावा करतान विलियम्सननं डाव घोषित केला. न्यूझीलंडनं ६ बाद ६५९ धावांवर डाव घोषित करून पहिल्या डावात ३६२ धावांची आघाडी घेतली.