NZ vs PAK 1st T20I ( Marathi News ) : ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी मालिकेत ३-० असा दारूण पराभव पत्करून पाकिस्तानचा संघ न्यूझीलंडमध्ये ट्वेंटी-२० मालिका खेळायला दाखल झाला. गचाळ क्षेत्ररक्षणाने त्यांचा पहिल्या सामन्यातही घात केला आणि झेल सोडण्याचा मोठा फटका त्यांना बसला. न्यूझीलंडचा कर्णधार केन विलियम्सन व डॅरिल मिचेल यांच्या अर्धशतकी खेळीने पाकिस्तानचे कंबरडे मोडले. त्यात फिन अॅलेन, मार्क चॅम्पमन यांनीही हात धुवून घेतले. पाकिस्तानचा कर्णधार व प्रमुख गोलंदाज शाहीन शाह आफ्रिदीच्या एका षटकात फिनने २४ धावा कुटल्या.
पाकिस्तानने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. शाहीन आफ्रिदीने दुसऱ्याच षटकात डेव्हॉन कॉनवेला भोपळ्यावर माघारी पाठवले. पण, फिनने त्याला झोडून काढले. त्याने शाहीनच्या एका षटकात २४ धावा चोपताना १५ चेंडूंत ३ चौकार व ३ षटकारासह ३५ धावांची खेळी केली. पदार्पणवीर अब्बास आफ्रिदीने ही विकेट मिळवून दिली. केनचा ९ धावांवर बाबर आजमने सोपा झेल टाकला, त्यात इफ्तिखारनेही किवी कर्णधाराला जीवदान दिले. याचा फायदा उचलताना केनने ४२ चेंडूंत ९ चौकारांसह ५७ धावांची खेळी केली.
डॅरिल मिचेलने २२ चेंडूंत अर्धशतक झळकावले. त्याच्या वादळी खेळीने पाकिस्तानी गोलंदाजांना सैरभैर केले. मिचेल २७ चेंडूंत ४ चौकार व ४ षटकारांसह ६१ धावांवर माघारी परतला. ग्लेन फिलिप्सने ११ चेंडूंत १९ धावा, मार्क चॅम्पमनने ११ चेंडूंत २६ धावा करताना धावसंख्येत हारभार लावला. न्यूझीलंडने ८ बाद २२६ धावांचा डोंगर उभा केला. न्यूझीलंडची ट्वेंटी-२०तील पाकिस्तानविरुद्ध ही सर्वोत्तम धावसंख्या ठरली. यापूर्वी २०१६ मध्ये वेलिंग्टन येथे ५ बाद १९६ धावा त्यांनी चोपलेल्या. शाहीनने ४६ धावा देताना ३, अब्बास आफ्रिदीने ३४ धावा देताना ३ आणि हॅरिस रौफने ३४ धावा देताना २ विकेट्स घेतल्या.