Dasun Shanaka, Sri Lanka vs Australia T20Is: भारतीय संघाचा माजी कर्णधार एमएस धोनीचे नाव जगातील सर्वोत्तम मॅच फिनिशरमध्ये घेतले जाते. नुकतेच टी२० क्रिकेटच्या सामन्यात एका खेळाडूने धोनीप्रमाणे सामना संपवून सर्वांचे लक्ष वेधून घेतले. या खेळाडूने टी२० मध्ये असा पराक्रम केला, जो आजच्या आधी कधीही झाला नव्हता. पल्लेकल येथे श्रीलंका आणि ऑस्ट्रेलिया (SRI vs AUS) यांच्यात खेळल्या गेलेल्या टी२० सामन्यात एक रोमांचक खेळी पाहायला मिळाली. या सामन्यात श्रीलंकेने हरलेली बाजी पलटवत सामना जिंकला.
सामना जिंकण्यासाठी श्रीलंकेला शेवटच्या ३ षटकांत म्हणजेच १८ चेंडूत ५९ धावांची गरज होती. त्यावेळी संघाने ६ विकेट गमावल्या होत्या. परंतु श्रीलंकेने सामना फिरवला आणि दमदार विजयाची नोंद केली. श्रीलंकेचा कर्णधार दासून शनाका आणि चमिका करुणारत्ने यांनी मिळून हा पराक्रम केला. टी२० आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये ३ षटकांत ५९ धावांची गरज असताना यापूर्वी कधीही असे लक्ष्य गाठले गेले नव्हते. पण दासून शनाकाने २५ चेंडूत ५४ धावा कुटल्या. त्याने ५ चौकार आणि ४ षटकार मारले. तो सुरूवातीला १२ चेंडू ६ धावांवर होता. त्यानंतर शनाकाने शेवटच्या १३ चेंडूत ४८ धावा केल्या. चमिका करुणारत्नेनेही नाबाद १४ धावा करत त्याला साथ दिली. पाहा VIDEO-
श्रीलंकेने सामना जरी जिंकला असला तरी पण ऑस्ट्रेलियन संघाने मालिका २-१ अशी खिशात घातली. या सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना ऑस्ट्रेलियाने ५ गडी बाद १७६ धावा केल्या. श्रीलंकेच्या संघाने हे लक्ष्य केवळ ६ गडी गमावून पूर्ण केले. पहिला टी२० सामना ऑस्ट्रेलियाने १० गडी राखून जिंकला होता, तर दुसरा टी२० सामना ऑस्ट्रेलियाने 3 गडी राखून जिंकला होता. त्यामुळे मालिका पाहुण्यांच्या नावे झाली.