Join us  

भारतीय क्रिकेटवर शोककळा! माजी कर्णधार दत्ताजीराव गायकवाड यांचे निधन

Dattajirao Gaekwad passed away- भारतीय क्रिकेट संघाचे माजी कर्णधार दत्ताजीराव गायकवाड (डीके) यांचे वयाच्या ९५ व्या वर्षी दुःखद निधन झाले.

By ऑनलाइन लोकमत | Published: February 13, 2024 11:19 AM

Open in App

Dattajirao Gaekwad passed away- भारतीय क्रिकेट संघाचे माजी कर्णधार दत्ताजीराव गायकवाड (डीके) यांचे वयाच्या ९५ व्या वर्षी दुःखद निधन झाले. माजी भारतीय क्रिकेटपटू आणि प्रशिक्षक अंशुमन गायकवाड यांचे ते वडील होते. दत्ताजीराव यांनी ११ कसोटी सामन्यांत भारताचे प्रतिनिधित्व केले. भारताच्या १९५९ सालच्या इंग्लंड दौऱ्यावर त्यांच्याकडे नेतृत्वाची जबाबदारी होती. दत्ताजीराव गायकवाड हे भारताचे सर्वात वयस्कर आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू होते.   

१९५२ ते १९६१ या कालावधीत त्यांनी क्रिकेटचे मैदान गाजवले होते. उत्तम बचाव आणि नेत्रदिपक फटके मारण्यात त्यांचा हातखंडा होता. मात्र, त्यांना भारतीय संघाच्या मधल्या फळीत फार जम बसवता आला नाही. १९५२ मध्ये त्यांनी इंग्लंडविरुद्ध सलामीवीर म्हणून पदार्पण केले. मधल्या फळीत जेव्हा त्यांना संधी मिळाली, तेव्हा त्यांनी उपयुक्तता दाखवून दिली होती. १९५३ चा वेस्ट इंडिज आणि १९५९च्या इंग्लंड दौऱ्यावर त्यांना संधी मिळाली. पाकिस्तानविरुद्ध १९५२-५३ व वेस्ट इंडिजविरुद्ध १९५८-५९च्या घरच्या मैदानावरील मालिकेतही ते खेळले. १९५९ मध्ये त्यांच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ इंग्लंड दौऱ्यावर खेळला, परंतु त्यात पाचही कसोटी भारताने गमावल्या होत्या. 

त्यांनी प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये ११७४ धावा केल्या आहेत. १९५९ मध्ये दिल्ली कसोटीत वेस्ट इंडिजविरुद्ध ५२ धावा ही त्यांची सर्वोत्तम धावसंख्या आहे. रणजी करंडक स्पर्धेत त्यांनी १९४७ ते १९६१ या कालावधीत ४७.५६ च्या सरासरीने ३१३९ धावा केल्या आणि त्यात १४ शतकांचा समावेश आहे. महाराष्ट्राविरुद्ध त्यांची नाबाद २४९ धावांची खेळी ही सर्वोत्तम धावसंख्या ठरली.  

टॅग्स :भारतीय क्रिकेट संघबीसीसीआय