मुंबई : महाराष्ट्राच्या शिरपेचात एक मानाचा तुरा खोवला गेला आहे. कारण महाराष्ट्राची एक कन्यात थेट बीसीसीआयमध्ये मोठ्या पदावर विराजमान झाली आहे.
एकेकाळी महाराष्ट्राचे बरेच जण बीसीसीआयमध्ये कार्यरत असल्याचे आपण पाहिले होते. पण सध्याच्या घडीला बीसीसीआयमध्ये मोठ्या पदावर मराठी माणूस दिसत नाही. महाराष्ट्राच्या कन्येने बीसीसीआयमधील मोठे पद मिळवले आहे.
बीसीसीआयमध्ये सध्याच्या घडीला निवड समिती सदस्यांची निवड करण्यात येणार आहे. निवड समितीमध्ये सध्याच्या घडीला दोन पदे रीक्त आहेत. माजी निवड समिती अध्यक्ष एमएसके प्रसाद आणि गगन खोडा यांचा कार्यकाळ संपला आहे. त्यामुळे या दोन पदांसाठी बीसीसीआयने अर्ज मागवले आहेत. आता या दोन निवड समिती सदस्यांची निवड ही महाराष्ट्राची कन्या करणार आहे.
बीसीसीआयमध्ये खेळाशी थेट संबंधित क्रिकेट सल्लागार समितीमध्ये भारताची माजी यष्टीरक्षक सुलक्षणा नाईकची निवड करण्यात आली आहे. त्यामुळे आता निवड समिती सदस्यांची निवड असो किंवा भारताच्या प्रशिक्षकांची निवड, या मोठ्या गोष्टींमध्ये आता सुलक्षणा यांची मोलाची भूमिका असणार आहे.
माजी भारतीय अष्टपैलू मदनलाल, वेगवान गोलंदाज आर. पी. सिंग आणि माजी यष्टीरक्षक सुलक्षणा नाईक यांचा शुक्रवारी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (बीसीसीआय) तीन सदस्यांच्या क्रिकेट सल्लागार समितीमध्ये समावेश असल्याची घोषणा करण्यात आली. सीएसीला सध्या वरिष्ठ निवड समितीमध्ये कार्यकाळ पूर्ण करणाऱ्या दोन सदस्यांचे स्थान घेणाºया निवड समिती सदस्यांची निवड करावी लागेल.
सीएसीला निवड समितीचे निवर्तमान अध्यक्ष एम. एस. के. प्रसाद (दक्षिण विभाग) आणि गगन खोडा (मध्य विभाग) यांचा पर्याय शोधावा लागणार आहे. बीसीसीआयचे सचिव जय शाह म्हणाले, ‘सीएसीची नियुक्ती वर्षभरासाठी राहील.’ कपिल देव, शांता रंगास्वामी आणि अंशुमन गायकवाड यांचा समावेश असलेल्या सीएसीने हित जोपसण्याचा आरोप झाल्यानंतर पदाचा त्याग केला होता. सीएसी उच्च स्तराची समिती असून त्यांना निर्धारीत नियमांमध्येच काम करायचे आहे. या आव्हानासाठी समितीतील सर्वत अनुभवी मदनलाल सज्ज झाले आहेत.