Rahul Tewatia David Miller, IPL 2022 GT vs RCB Live: हार्दिक पांड्याच्या गुजरात टायटन्सची यंदाच्या हंगामातील विजयी घोडदौड RCB विरूद्धच्या सामन्यातही सुरूच राहिली. विराट कोहली (५८) आणि रजत पाटीदार (५२) यांच्या अर्धशतकाच्या बळावर रॉयल चॅलेंजर्स बंगलोरने १७० धावा केल्या होत्या. या आव्हानाच्या प्रत्युत्तरात गुजरातची वरची फळी फारशी प्रभावी ठरली नाही. पण फिनिशर जोडी राहुल तेवातिया - डेव्हिड मिलर यांनी संघाला शेवटच्या षटकात विजय मिळवून दिला.
टॉस जिंकून RCB ने प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. कर्णधार डु प्लेसिस शून्यावर बाद झाला. त्यानंतर विराट-रजत जोडीने चांगली सुरूवात केली. रजत पाटीदारने ३२ चेंडूत ५ चौकार आणि २ षटकार लगावत ५२ धावा केल्या. तर विराट कोहलीने ५३ चेंडूत ६ चौकार आणि एक षटकार खेचत ५८ धावा केल्या. या दोघांनंतर ग्लेन मॅक्सवेलने तुफानी खेळीला सुरूवात केली होती. पण १८ चेंडूत ३ चौकार आणि २ षटकार मारल्यावर तो ३३ धावांवर बाद झाला. अखेरच्या टप्प्यात आपला पहिलाच सामना खेळणार महिपाल लोमरॉर याने ८ चेंडूत १६ धावा केल्या.
प्रत्युत्तरात, गुजरातचे सलामीवीर वृद्धिमान साहा आणि शुबमन गिल दोघांनी चांगली सुरूवात केली. पण साहा २९ तर गिल ३१ धावा काढून बाद झाला. साई सुदर्शनने २० धावा केल्या. तर हार्दिक पांड्या ३ धावांवर माघारी परतला. ९५ धावांवर गुजरातने ४ गडी गमावले होते. त्यानंतर डेव्हिड मिलर आणि राहुल तेवातिया जोडीने सामन्यावर पकड मिळवली. ४२ चेंडूत ७६ धावांची गरज असताना हे दोघे मैदानात एकत्र आले. त्यानंतर या दोघांनी नाबाद राहत ६ गडी आणि ३ चेंडू राखून सामना जिंकवून दिला. डेव्हिड मिलरने २४ चेंडूंमध्ये ४ चौकार आणि १ षटकार खेचत नाबाद ३९ धावा केल्या. तर राहुल तेवातियाने २५ चेंडूत ५ चौकार आणि २ षटकारांसह नाबाद ४३ धावा केल्या.