नवी दिल्ली : मास्टर-ब्लास्टर सचिन तेंडुलकरच्या नावावर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये बरेच विक्रम आहेत. विक्रम हे मोड्ण्यासाठी असतात. त्यामुळे त्याचे विक्रम काही खेळाडूंनी मोडले आहेत, तर काही मोडण्याच्या उंबरठ्यावर आहेत. सध्याच्या घडीला ऑस्ट्रेलियाचा धडाकेबाज सलामीवीर डेव्हिड वार्नर हा भन्नाट फॉर्मात आहे आणि तो सचिनचा एक विक्रम मोडू शकतो, असे म्हटले जात आहे.
दक्षिण आफ्रिकेतील केप टाऊन येथील न्यूलँड्स या मैदानात आतापर्यंत कोणत्याही फलंदाजाला तीन शतके झळकावता आलेली नाही. पण सचिन आणि ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार मायकेल क्लार्क यांनी या मैदानात आतापर्यंत दोन शतके झळकावली आहेत. त्याचबरोबर वॉर्नरच्या नावावरही दोन शतके आहेत. त्यामुळे त्याने या मैदानात शतक झळकावले तर तो सचिन आणि क्लार्क यांमा मागे टाकू शकतो.
न्यूलँड्सच्या मैदानात सचिनने 1996 साली पहिले शतक झळकावले होते, त्याने त्यावेळी 169 धावा केल्या होत्या. त्यानंतर 2011 साली सचिनने या मैदानात 146 धावांची खेळी साकारली होती. क्लार्कने 2011 साली 151 धावा आणि 2014 साली 161 धावा केल्या होत्या. वार्नरने या मैदानात 2014च्या एकाच दौऱ्यात 145 आणि 135 धावांची खेळी साकारली होती.
न्यूलँडस येथे ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका यांच्यामध्ये तिसरा कसोटी सामना सुरु आहे. या सामन्याच्या पहिल्या डावात वॉर्नरने 30 धावा केल्या आहेत. पण दुसऱ्या डावात त्याने शतक झळकावले तर तो सचिन आणि क्लार्क यांचा विक्रम मोडू शकतो.