सिडनी : दक्षिण आफ्रिकेतील कसोटी सामन्यात चेंडू कुडतडण्या प्रकरणी ऑस्ट्रेलियाचे स्टीव्हन स्मिथ, डेव्हिड वॉर्नर आणि कॅमेरून बॅनक्रॉफ्ट दोषी आढळले होते. तत्कालीन कर्णधार स्मिथ आणि उपकर्णधार वॉर्नर यांच्यावर एका वर्षांची बंदी घालण्यात आली, तर बॅनक्रॉफ्टला नऊ महिन्यांची शिक्षा झाली. बॅनक्रॉफ्टची शिक्षा डिसेंबर महिन्याच्या अखेरीस संपणार आहे आणि या नऊ महिन्यांत प्रकरणावर भाष्य करण्यास टाळाटाळ करणाऱ्या बॅनक्रॉफ्टने बुधवारी मौन सोडले. वॉर्नरने चेंडू कुडतडण्यासाठी आपल्याला प्रोत्साहीत केल्याचा दावा त्याने केला.
मागील आठवड्यात स्मिथने या प्रकरणी पत्रकार परिषद घेतली होती. त्यात त्याने वॉर्नर आणि बॅनक्रॉफ्ट यांच्यात सुरु असलेल्या संवादाबद्दल आपल्याला माहिती होती, असे सांगितले होते. त्यानंतर आज बॅनक्रॉफ्टने मत व्यक्त केले. तो म्हणाला,''मी उपकर्णधार वॉर्नरच्या सल्ला ऐकला. त्याने मला चेंडू कुडतडण्यासाठी प्रोत्साहीत केले. मला त्याचे ऐकणे भाग होते, कारण मला संघात स्थान कायम टिकवायचे होते. त्या चुकीचा मला मोठा भुर्दंड भरावा लागला.''
'' केलेल्या कृत्याची मी जबाबदारी घेतो. मला हे टाळता आले असते, परंतु मी चुक केली,'' असेही तो म्हणाला. क्रिकेट ऑस्ट्रेलियाने घातलेली नऊ महिन्यांची बंदी संपत असून तो 30 डिसेंबरला बिग बॅश लीगमधून पुनरागमन करणार आहे.