David Warner on Virat Kohli Form: दिग्गज खेळाडू विराट कोहलीचा फॉर्म सध्या फारच खराब आहे. एकेकाळी आपल्या बॅटिंगच्या जोरावर विरोधी संघांमध्ये दहशत निर्माण करणारा किंग कोहली हल्ली मैदानावर मूठभर गोलंदाजांसमोरही झुंजताना दिसत आहे. IPL 2022 मध्ये, विराटने १० सामन्यांमध्ये २१च्या सरासरीने आणि ११६च्या अत्यंत सुमार स्ट्राइक रेटने फक्त १८६ धावा केल्या आहेत. ऑस्ट्रेलियातील टी२० विश्वचषक जवळ आल्याने विराट कोहली अशाप्रकारे झगडतोय ही टीमसाठी चिंतेची बाब आहे. दरम्यान, एका प्रसिद्ध यूट्यूब चॅनलवर डेव्हिड वॉर्नरला विराट कोहलीच्या फॉर्मबाबत प्रश्न विचारण्यात आला. त्यावर त्याने विराटला अतिशय अजब सल्ला दिला.
डेव्हिड वॉर्नरला विचारण्यात आले की, 'वर्ल्ड कप जवळ आला आहे, विराट कोहलीचा फॉर्म खूपच खराब आहे. गेल्या विश्वचषकाआधी तुझा फॉर्म खूपच खराब होता. लोक म्हणत होते की तू संपला आहेस, तू आता फलंदाजी करू शकत नाहीस. पण तू विश्वचषकात साऱ्यांनाच तुझ्या फलंदाजीने थक्क केलेस. मग सध्या त्या परिस्थितीतून जाणाऱ्या विराट कोहलीला तू काय सल्ला देशील? विराट कोहलीने काय करावे असं तुला वाटतं?
डेव्हिड वॉर्नरने विराट कोहलीला दिला अजब सल्ला, पाहा व्हिडीओ-
या प्रश्नाचे उत्तर अतिशय मजेशीरपणे देताना वॉर्नर म्हणाला, त्याने सध्या आणखी २ मुलं जन्माला घालावीत आणि परिवारासोबत राहून प्रेमाचा आनंद घ्यावा. त्यालाच जोडून पुढे वॉर्नर म्हणाला की, प्रामाणिकपणे सांगायचे तर मी या प्रश्नाचे उत्तर देऊ शकत नाही. फॉर्म हा तात्पुरता असतो आणि क्लास (दर्जा) हा शाश्वत टिकणारा असतो. तुमचा दर्जा कधीही घसरू देऊन नका. तुमचा फॉर्म नक्कीच परतेल.
डेव्हिड वॉर्नर यात पुढे म्हणाला की, विराटने यात काळजी करण्यासारखे काहीही नाही. हे प्रत्येक खेळाडूसोबत घडते. तुम्ही किती चांगले खेळाडू आहात हे महत्त्वाचे नाही, प्रत्येकाला या टप्प्यातून जावे लागेल. कधी कधी तुमचा वाईट टप्पा जास्त काळ टिकतो. अशा परिस्थितीत, तुम्हाला फक्त मूलभूत गोष्टींवर लक्ष केंद्रित करावे लागेल.