IPL 2022, Sunrisers Hyderabad vs Delhi Capitals Live Updates : ८ वर्षांनंतर प्रथमच सनरायझर्स हैदराबादविरुद्ध मैदानावर उतरलेल्या डेव्हिड वॉर्नरने ( David Warner) झालेल्या अपमानाची सव्याज परतफेड केली. मागील पर्वात हैदराबादने वॉर्नरकडून कर्णधारपद काढून घेतले, त्याला अंतिम ११मधून बाहेर केले आणि ऑक्शनपूर्वी रिटेनही नाही केले. त्यानंतर दिल्ली कॅपिटल्सकडून खेळणाऱ्या वॉर्नरने आज त्या सर्व अपमानाचा राग आपल्या खेळीतून काढला. दिल्लीचा डाव सावरताना त्याने खणखणीत अर्धशतक झळकावताना विश्वविक्रमाची नोंद केली आणि संघाला मजबूत धावसंख्या उभारूनही दिली. रोव्हमन पॉवेलनेही ( Rovman Powell) त्याच्यासोबत हैदराबादच्या गोलंदाजांना बदडले... वॉर्नर व पॉवेल या जोडीनं ६३ चेंडूंत शतकी भागीदारी केली.
वॉर्नर व पॉवेल या जोडीनं हैदराबादच्या गोलंदाजांना धु धु धुतला... १७व्या षटकात सीन अॅबोटच्या गोलंदाजीवर पॉवेलने दोन उत्तुंग षटकार खेचले. ६३ चेंडूंत या दोघांनी शतकी भागीदारी पूर्ण केली. पॉवेलने ३० चेंडूंत अर्धशतक पूर्ण केले. २०वे षटक पॉवेलनेच खेळून काढल्याने वॉर्नरचे शतक होऊ शकले नाही. वॉर्नर ५८ चेंडूंत १२ चौकार व ३ षटकारांसह ९२ धावांवर नाबाद राहिला. पॉवेलने ३५ चेंडूंत ३ चौकार व ६ षटकारांसह नाबाद ६७ धावा केल्या. दिल्लीच्या ३ बाद २०७ धावा झाल्या. या दोघांनी ६६ चेंडूंत १२२ धावांची भागीदारी केली.
सनरायझर्स हैदराबादसाठी डेव्हिड वॉर्नरचे योगदान!२०१४मध्ये सनरायझर्स हैदराबादने वॉर्नरला करारबद्ध केले. त्यानंतर २०१५, २०१७ व २०१९ साली या संघाकडून वॉर्नरने ऑरेंज कॅप जिंकली आणि २०१६मध्ये हैदराबादला मिळालेलं एकमेव जेतेपद हे वॉर्नरच्याच नेतृत्वाखाली आहे. तरीही मागील दोन पर्वात अपयश आल्यामुळे फ्रँचायझीने वॉर्नरला अपमानास्पद वागणूक दिली. त्याच्याकडून कर्णधारपद काढून घेतलेच, शिवाय त्याला अंतिम ११मधूनही बाहेर केले. हैदराबादसाठी वॉर्नरने ९५ सामन्यांत ४९.५५च्या सरासरीने ४०१४ धावा केल्या आहेत. त्यात ४० अर्धशतकं व २ शतकांचा समावेश आहे.