IPL मधील कामगिरीत सातत्य राखणारा स्टार फलंदाज म्हणजे डेव्हिड वॉर्नर. त्याने गेल्या पाच-सहा वर्षात IPLमध्ये आपला ठसा उमटवला. २०१६ साली त्याच्या नेतृत्वाखाली हैदराबाद संघाने विजेतेपदही मिळवलं. पण गेल्या हंगामात मात्र त्याला चांगली कामगिरी करता आली नाही. त्यामुळे त्याला कर्णधारपदावरून तर हटवण्यात आलेच पण त्यासोबतच संघातून बाहेर करण्यात आले. याच मुद्द्यावर अखेर डेव्हिड वॉर्नरने मौन सोडलं.
"तुम्ही जर संघाच्या कर्णधारालाच संघातून बाहेर काढणार असाल आणि परत संघात घेणार नसाल तर अशा वेळी कर्णधाराने काय करावं? असं करून नव्या पिढीला काय संदेश मिळेल? संघातील इतर खेळाडूंना यातून काय संदेश मिळेल. मला सर्वाधिक दु:ख या गोष्टीचं झालं की आता या सगळ्या घटना पाहून इतर खेळाडू विचार करतील की असं माझ्या बाबतीतही होऊ शकतं. जे झालं ते झालं. पण तुम्ही त्या खेळाडूशी शांतपणे संवाद साधणं गरजेचं असतं. संघ व्यवस्थापनाने माझ्याशी थोडा तरी संवाद साधायला हवा होता. मी त्यांना खाणार नव्हतो", असं वॉर्नर म्हणाला.
"क्रिकेट खेळणं मला खूप आवडतं. मी खेळाबाबत खूप आग्रही आहे. मी जिथे खेळतो तेथील फॅन्सशी कनेक्ट होतोच. कारण मला माहिती आहे की फॅन्स हे खूप महत्त्वाचे असतात. मैदानावर खेळणाऱ्या चिमुरड्यांना सचिन, विराट, वॉर्नर, विल्यमसन, स्मिथ असं कोणी ना कोणी व्हायचं असतं. अशी छोटी मुलं आमच्यावर लक्ष ठेवून असतात. अन् त्याच वेळी जेव्हा आमच्या बाबतीत असं घडतं ते पाहून ती मुलं हिरमुसतात. आणि तेच मला आवडत नाही", असंही डेव्हिड वॉर्नरने स्पष्ट केलं.