ब्रिसबन : चेंडू कुरतडण्याच्या प्रकरणात एका वर्षांच्या बंदीची शिक्षा पूर्ण करून स्टीव्हन स्मिथ आणि डेव्हिड वॉर्नर यांनी सोमवारी ऑस्ट्रेलियाच्या राष्ट्रीय संघात पुनरागमन केले. इंडियन प्रीमिअर लीगमध्ये ( आयपीएल ) दमदार कामगिरी करून हे दोघेही राष्ट्रीय कर्तव्यासाठी मायदेशात दाखल झाले. त्यांच्या पुनरागमनाने ऑस्ट्रेलियाच्या संघाला बळ मिळाले आहे आणि वर्ल्ड कप जेतेपद कायम राखण्यासाठी त्यांनी कंबर कसली आहे. वॉर्नर व स्मिथ यांच्या समावेशाने ऑस्ट्रेलियाचा संघ संतुलित वाटत असला तरी सलामीच्या जागेवरून संघात दोन प्रवाह निर्माण होण्याची शक्यता आहे. सलामीसाठी वॉर्नरचं नाणं खणखणीत असलं तरी त्यानं हे स्थान गमावल्याचे पाहायला मिळाले.
वर्ल्ड कप तयारीच्या दृष्टीने ऑस्ट्रेलियाच्या संघाने सोमवारी न्यूझीलंड एकादश संघाविरुद्ध सराव सामना खेळला. या सामन्यातून स्मिथ व वॉर्नरने राष्ट्रीय संघात कमबॅक केले. स्मिथने पहिल्याच सामन्यात उत्तम क्षेत्ररक्षण करत आपली छाप पाडली. त्याने न्यूझीलंडच्या टॉम लॅथमचा अप्रतिम झेल टिपला. ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांनी न्यूझीलंडचा डाव 46.1 षटकांत 215 धावांवर गुंडाळला. पॅट कमिन्स ( 3/36), बेहरेनडोर्फ ( 3/34) आणि नॅथन कोल्टर नायल ( 3/44) यांनी प्रत्येकी तीन विकेट घेतल्या.
प्रत्युत्तरात अॅरोन फिंच याच्यासोबत सलामीला कोण येईल याची उत्सुकता लागली होती. पण, संघाने वॉर्नरच्या जागी उस्मान ख्वाजा सलामीला आला आणि सर्वांच्या भूवया उंचावल्या. पण, तिसऱ्या क्रमांकावर आलेल्या वॉर्नरने 43 चेंडूंत 39 धावांची खेळी करतान सर्वांची वाहवाह मिळवली. त्याच्या या खेळीत 6 चौकार व 1 षटकाराचा समावेश होता. ऑस्ट्रेलियाने 1 विकेट राखून हा सामना जिंकला. फिंचने 52 धावांची खेळी केली.
वर्ल्ड कप साठीचा ऑस्ट्रेलियाच संघ - अॅरोन फिंच, जेसन बेहरेनडोर्फ, अॅलेक्स करी, नॅथन कोल्टर नायल, पॅट कमिन्स, उस्मान ख्वाजा, नॅथन लियॉन, शॉन मार्श, ग्लेन मॅक्सवेल, झाय रिचर्डसन, स्टीव्हन स्मिथ, मिचेल स्टार्क, मार्कस स्टॉयनिस, डेव्हिड वॉर्नर, अॅडम झम्पा.
Web Title: David Warner returned to Australia, but lost the opener's place
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.