कोरोना व्हायरसमुळे सर्व क्रीडा स्पर्धा रद्द झाल्यामुळे खेळाडू आपापल्या घरीच आहेत. त्यामुळे चाहत्यांशी संवाद साधण्यासाठी ते सोशल मीडियाचा उपयोग करत आहेत. याच मीडियाच्या माध्यमातून कोरोना व्हायरसशी दिवसरात्र झगडणाऱ्या वैद्यकिय कर्मचाऱ्यांप्रती ऑस्ट्रेलियाचा सलामीवीर डेव्हिड वॉर्नर यांनी आदर व्यक्त केला आहे. त्यानं मुंडन करून वैद्यकिय कर्मचाऱ्यांना पाठिंबा दर्शविला आहे आणि त्यानं या चळवळीत टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीसह संपूर्ण ऑस्ट्रेलयन संघाला नॉमिनेट केले आहे.
जगभरातील कोरोना रुग्णांचा आकडा हा 7 लाख 85,807 इतका झाला आहे, तर मृतांचा आकडा 37,820 पर्यंत पोहोचला आहे. 1 लाख 65,659 रुग्ण बरे झाले असले तरी आणखी अनेकांना बरं करण्यासाठी वैद्यकिय कर्मचारी स्वतःच्या जीवाची पर्वा न करता काम करत आहेत. वॉर्नरनं स्वतःच्या डोक्यावरील केस कापून डॉक्टर, नर्स आणि अन्य कर्मचाऱ्यांप्रती आदर व्यक्त केला. त्यानं एक व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट केला आहे.
त्यानं ही चळवळ अशीच पुढे राहण्यासाठी विराट कोहलीसह ऑस्ट्रेलियन संघातील सदस्य स्टीव्ह स्मिथ, पॅट कमिन्स, जो बर्न्स, अॅडम झम्पा आणि मार्कस स्टॉयनिस यांना नॉमिनेट केलं आहे. आता कोहली हे आव्हान स्वीकारतो का, हे पाहणं औत्सुक्याचं ठरेल. ''कोरोना व्हायरसशी मुकाबला करणाऱ्या त्या प्रत्येकाला पाठिंबा दर्शविण्यासाठी मी मुंडन केले आहे,'' असे वॉर्नरने लिहीले आहे. ऑस्ट्रेलियात कोरोना रुग्णांची संख्या 4514 वर गेली आहे आणि 19 जणांचा मृत्यू झाला आहे.
काही दिवसांपूर्वी विराट आणि अनुष्का शर्मा यांनी एक व्हिडीओ पोस्ट केला होता. त्यात अनुष्का विराटचे केस कापताना दिसत आहे.