लंडन, अॅशेस 2019 : सध्याच्या घडीला इंग्लंडमध्ये अॅशेस मालिका सुरु आहे. या मालिकेदरम्यान इंग्लंडचे चाहते ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूंना डिवचण्याचा प्रयत्न करताताना पाहायला मिळत आहेत. एका चाहत्याने ऑस्ट्रेलियाचा सलामीवीर डेव्हिड वॉर्नरला थेट 'बेईमान' म्हटले. पण त्यावर वॉर्नरने अशी काही प्रतिक्रीया दिली की, त्या चाहत्याची बोलतीच बंद झाल्याचे पाहायला मिळाले.
वॉर्नर आणि स्टीव्हन स्मिथ यांच्यावर चेंडूशी छेडछाडकेल्याप्रकरणी एका वर्षाची बंदी घालण्यात आली होती. त्यानंतर या दोघांची ही पहिलीच अॅशेस मालिका आहे. स्मिथ हा भन्नाट फॉर्मात आहे. त्याने चौथ्या कसोटी सामन्यात द्विशतक झळकावले आहे. पण वॉर्नरला मात्र आतापर्यंत मालिकेत सूर गवसलेला नाही. वॉर्नर आतापर्यंतच्या सात डावांमध्ये फक्त 11.29च्या सरासरीने 79 धावा केल्या आहेत. त्यामुळे चाहते त्याच्यावर जोरदार टीका करताना दिसतात. या चौथ्या सामन्यात क्षेत्ररक्षणाला जाताना एका चाहत्याने वॉर्नरला बेईमान म्हटले. ही टीका वॉर्नरने पचवली आणि त्या चाहत्याने दोन्ही हाताचे अंगठे दाखवले. त्यानंतर या प्रेक्षकाला अन्य लोकांनी चांगलेच धारेवर धरले आणि त्याची बोलतीबंद झाल्याचे समजले.
हा पाहा खास व्हिडीओ
चौथ्या कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी स्वीकारली. यावेळी फलंदाजीला उतरलेल्या ऑस्ट्रेलियाचा सलामीवीर डेव्हिड वॉर्नरला भोपळाही फोडता आला नाही. वॉर्नरला यावेळी इंग्लंडचा वेगवान गोलंदाज स्टुअर्ट ब्रॉडने आऊट केले. आतापर्यंत वॉर्नरला सर्वाधिक वेळा बाद करण्याचा पराक्रम यावेळी ब्रॉडने केला आहे. ब्रॉडने आतापर्यंत दहा वेळा वॉर्नरला कसोटी क्रिकेटमध्ये बाद केले, यापूर्वी हा विक्रम इंग्लंडचाच वेगवान गोलंदाज जेम्स अँडरसनच्या नावावर होता. अँडरसनने वॉर्नरला 9 वेळा बाद केले होते.
सामन्याच्या दुसऱ्याच चेंडूवर वॉर्नर बाद झाला. जर वॉर्नर पहिल्याच चेंडूवर बाद झाला असता तर त्याला गोल्डन डक, असे म्हटले असते. पण वॉर्नर दुसऱ्या चेंडूवर बाद झाल्यामुळे त्याला 'Silver Duck' असे म्हटले गेले.