ऑस्ट्रेलियाचा तडाखेबंद फलंदाज डेव्हिड वॉर्नर यंदाच्या आयपीएलमध्ये म्हणावा तसा चमकत नव्हता पण गुरुवारी तो चमकला आणि सनरायजर्स हैदराबादने किंग्ज इलेव्हनवर दणदणीत विजय नोंदवला. यासह सनरायजर्सचा कर्णधार म्हणून वाॕर्नरच्या नावावर असा विक्रम लागला ज्याच्या कुणाही कर्णधाराला हेवा वाटेल.
वॉर्नरने 40 चेंडूतच 52 धावा फटकावल्या. हे त्याचे आयपीएलमधील अर्धशतकांचे अर्धशतक तर होतेच शिवाय किंग्स इलेव्हन विरुध्दचे सलग नववे अर्धशतक होते आणि 'सोने पे सुहागा' म्हणजे कर्णधार म्हणून त्याचा किंग्स इलेव्हनवर हा सलग सातवा विजय होता. अर्थातच सातही विजयात अर्धशतकी खेळी होतीच आणि अशी कामगिरी करणारा तो आयपीएलमधील एकमेव कर्णधार आहे.
किंग्ज इलेव्हनविरुध्द खेळताना काय जादू होते की काय की अचानक वॉर्नर फॉर्मात येतो असा प्रश्न असा किंग्स इलेव्हनसह चाहत्यांना पडला आहे. त्याची किंग्स इलेव्हनविरुध्दची सलग नऊ अर्धशतकं हासुध्दा एखाद्या संघाविरुध्द लागोपाठ अर्धशतकं झळकावण्याचा विक्रम आहे. त्याच्या आयपीएलमधील अर्धशतकांचे अर्धशतकही 132 डावात लागले आहे. यात त्याच्या चार शतकांचा समावेश आहे. किंग्स इलेव्हनविरुध्द त्याने एकूण 11 अर्धशतकं केली आहेत. वॉर्नरनंतर विराट कोहलीची 174 डावात 42 अर्धशतकं आहेत.
यशस्वी कर्णधार म्हणून एखाद्या संघाविरुध्द 100 टक्के सामने जिंकण्यात तो सर्वांच्या पुढे आहे. त्याच्यानंतर सचिन तेंडूलकर आहे ज्याने कोलकाता नाईट रायडर्सवर सहा विजय मिळवले आहेत. आणि स्वतः डेव्हिड वॉर्नरनेच गुजरात लायन्सविरुध्दचे पाचही सामने जिंकले आहेत.