ऑस्ट्रेलिया आणि पाकिस्तान यांच्यातल्या डे नाइट कसोटीत डेव्हिड वॉर्नरनं तुफान फटकेबाजी केली. ऑस्ट्रेलियानं पहिला 3 बाद 589 धावांवर डाव घोषित केला आणि त्याचा पाठलाग करणारा पाकिस्तानचा पहिला डाव 302 धावांत गडगडला. दुसऱ्या डावातही पाकिस्तानचा निम्मा संघ 174 धावांवर माघारी परतला आहे. ऑसींच्या खेळीत वॉर्नरचे त्रिशतक महत्त्वाचे ठरले. कसोटी क्रिकेटमध्ये वॉर्नरनं प्रथमच त्रिशतक झळकावले. पाक गोलंदाजांची धुलाई करून नाबाद 335 धावा कुटणाऱ्या वॉर्नरच्या या खेळीनंतर त्याच्या पत्नीनं सोशल मीडियावर एक पोस्ट टाकली. त्यात तिनं महत्मा गांधी यांचा विचार मांडला आहे.
चेंडूशी छेडछाड केल्या प्रकरणी वॉर्नरसह स्टीव्ह स्मिथ आणि कॅमेरून बँक्रॉफ्ट यांच्यावर बंदी घालण्यात आली होती. त्यानंतर वॉर्नरनं इंडियन प्रीमिअर लीगमध्ये दमदार कमबॅक केले. वर्ल्ड कप स्पर्धेतही त्यानं तो फॉर्म कायम राखला, त्यानं 10 सामन्यांत 647 धावा कुटल्या. त्यात 3 शतकं व 3 अर्धशतकांचा समावेश होता. पण, त्यानंतर झालेल्या अॅशेस मालिकेत त्याला अपयश आले. पण, घरच्या मैदानावर सुरू असलेल्या पाकिस्तानविरुद्धच्या मालिकेत त्यानं कसोटीतील फॉर्मही पुन्हा मिळवला आहे. दुसऱ्या कसोटीत त्यानं 418 चेंडूंत 39 चौकार व 1 षटकार खेचून नाबाद 335 धावांची विक्रमी खेळी केली. ऑस्ट्रेलियाकडून ही दुसरी सर्वोत्तम वैयक्तिक खेळी ठरली.