Join us  

टीम इंडियाला कोंडीत पकडणारा निवृत्त; इंग्लंडच्या स्टार खेळाडूचा आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम

गतविजेत्या इंग्लंडच्या संघाला वन डे विश्वचषक २०२३ मध्ये खास कामगिरी करता आली नाही.

By ऑनलाइन लोकमत | Published: November 01, 2023 1:53 PM

Open in App

गतविजेत्या इंग्लंडच्या संघाला वन डे विश्वचषक २०२३ मध्ये खास कामगिरी करता आली नाही. क्रमवारीत तळाशी असलेल्या इंग्लिश संघावर स्पर्धेबाहेर होण्याची नामुष्की ओढावली आहे. अशातच संघाचा वेगवान गोलंदाज डेव्हिड विलीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त होत असल्याचे जाहीर केले. अलीकडेच भारताविरूद्धच्या सामन्यात विलीने घातक मारा करताना तीन बळी घेऊन यजमानांना कोडींत पकडले होते. त्याने विराट कोहली, लोकेश राहुल आणि सूर्यकुमार यादव या त्रिकुटाला बाहेरचा रस्ता दाखवला होता. खरं तर सध्या सुरू असलेल्या विश्वचषकानंतर तो निवृत्त होणार आहे.

विलीने सोशल मीडियावर एक भलीमोठी पोस्ट करत निवृत्त होत असल्याचे जाहीर केले. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त असल्याचे सांगताना विलीने पोस्टच्या माध्यमातून म्हटले की, हा दिवस यावा असे मला कधीच वाटत नव्हते. माझी पहिल्यापासूनच इंग्लंडसाठी क्रिकेट खेळायची इच्छा होती. इथपर्यंतचा प्रवास खूप चांगला आणि संस्मरणीय राहिला. पण, आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त होण्याची हीच चांगली वेळ असल्याचे मला वाटते. मी एवढ्या चांगल्या संघाचा भाग राहिलो याचा अभिमान आहे. इंग्लिश संघासोबत माझ्या खूप आठवणी आहेत, ज्यांनी मला कठीण काळात साथ दिली. माझे स्वप्न सत्यात उतरवण्यासाठी तडजोड करणाऱ्या सर्वांचे आभार... माझी पत्नी, मुले, आई आणि वडिलांचा मी ऋणी आहे. सर्वांचे आभार...!!

दरम्यान, चालू विश्वचषक म्हणजे इंग्लिश संघासाठी एक वाईट स्वप्नच. ट्वेंटी-२० आणि वन डे विश्वचषकाचे मानकरी असलेल्या इंग्लंडने यंदाच्या पर्वात निराशाजनक कामगिरी केली. जोस बटलरच्या नेतृत्वातील संघाला सहापैकी केवळ १ सामना जिंकता आला आहे. अफगाणिस्तानने देखील गतविजेत्यांना पराभवाची धूळ चारून उलटफेर केला. केवळ दोन गुणांसह इंग्लंडचा संघ आताच्या घडीला विश्वचषकाच्या गुणतालिकेत तळाशी आहे. गतविजेत्यांना शेवटच्या सामन्यात भारताकडून दारूण पराभवाचा सामना करावा लागला. यजमान संघाने इंग्लंडचा १०० धावांनी पराभव करून विजयी षटकार लगावला. प्रथम फलंदाजी करताना भारताने ९ बाद २२९ धावा केल्या होत्या. सोप्या आव्हानाचा पाठलाग करताना इंग्लिश संघ ३४.५ षटकांत १२९ धावांवर सर्वबाद झाला. 

टॅग्स :वन डे वर्ल्ड कपभारत विरुद्ध इंग्लंडइंग्लंडआंतरराष्ट्रीय क्रिकेट