नवी दिल्ली : ‘अंडरवर्ल्ड डॉन’ दाऊद इब्राहिम याने पाकिस्तानविरुद्ध सामना गमाविण्यासाठी भारताच्या ड्रेसिंग रूममध्ये येऊन खेळाडूंना चक्क टोयोटा कार देण्याची ऑफर दिली. तत्कालीन कर्णधार कपिल देव यांनी त्याला चक्क हाकलून लावले होते.
झी न्यूजने बीसीसीआयचे माजी सचिव जयवंत लेले यांच्या ‘आय वॉज देअर- मेमरीज ऑफ अ क्रिकेट ॲडमिनिस्ट्रेटर’ या पुस्तकातील लिखाणाचा हवाला देत म्हटले की, हा प्रसंग १९८७ चा आहे. भारतीय संघ शारजात ऑस्ट्रेलेशिया चषक स्पर्धा खेळत होता. भारत- पाकिस्तान सामन्यादरम्यान दाऊद भारताच्या ड्रेसिंग रूममध्ये शिरला. त्यावेळी तो म्हणाला होता की, ‘भारताने हा सामना गमाविल्यास संघातील प्रत्येक खेळाडूला टोयोटा कार गिफ्ट दिली जाईल.’ माजी क्रिकेटपटू दिलीप वेंगसरकर यांनीदेखील जळगावच्या एका कार्यक्रमात या आठवणीला उजाळा दिला होता.
वेंगसरकर यांच्या मते, कपिल माध्यमांशी संवाद साधल्यानंतर ड्रेसिंग रूमकडे येत असताना त्यांची नजर दाऊदवर गेली. कपिल म्हणाले, ‘हा कोण आहे?’ त्यांनी त्या व्यक्तीला लगेच बाहेर जाण्यास सांगितले. दाऊद गुपचूप ड्रेसिंग रूमबाहेर गेला. जाता जाता तो म्हणाला होता, ‘आता कार कॅन्सल..!’ या घटनेनंतर भारताच्या ड्रेसिंग रूममध्ये पाकिस्तानचा खेळाडू जावेद मियांदाद आला होता.