Join us  

Flashback : भारताने 36 वर्षांपूर्वी पहिल्यांदा उंचावला वर्ल्ड कप; जाणून घ्या यशाची कहाणी

On this day in 1983 विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ पुन्हा एकदा वर्ल्ड कप जिंकण्याच्या निर्धाराने खेळ करत आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: June 25, 2019 9:54 AM

Open in App

लंडन, आयसीसी वर्ल्ड कप 2019 : विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ पुन्हा एकदा वर्ल्ड कप जिंकण्याच्या निर्धाराने खेळ करत आहे. भारतीय संघानं उपांत्य फेरीच्या दिशेनं जोरदार आघाडी घेतली आहे. सातत्यपूर्ण कामगिरी करताना भारतीय संघाने आतापर्यंत अपराजित मालिका कायम राखली आहे. त्यामुळे यंदाच्या वर्ल्ड कप जेतेपदाच्या दावेदारात भारतीय संघ आघाडीवर आहे. 

भारताने 1983मध्ये वेस्ट इंडिजला धक्का देत पहिल्यांदा वर्ल्ड कप उंचावण्याचा पराक्रम केला होता. 36 वर्षांपूर्वी आजच्याच दिवशी भारताने ही ऐतिहासिक कामगिरी केली होती.  1979च्या वर्ल्ड कप स्पर्धेत ग्रुप स्टेजमध्येच बाहेर पडलेला भारतीय संघ 1983मध्ये दोन वेळेच्या विश्वविजेत्या विंडीजला धक्का देत बाजी मारेल, असे कोणाच्याही ध्यानीमनी नव्हते. पण, कपिल देव यांच्या नेतृत्वाखाली भारताने हा पराक्रम केला आणि चाहत्यांना आनंद साजरा करण्याची संधी दिली. 

हा वर्ल्ड कप विजयाचा प्रवास कसा होता, चला जाणून घेऊया...भारतीय संघाने ब गटातून विंडीजसह उपांत्य फेरीत प्रवेश मिळवला होता. ग्रुप स्टेजमध्ये भारताने 6पैकी 4 सामने जिंकून गटात दुसरे स्थान पटकावले होते. उपांत्य फेरीत भारताचा सामना यजमान इंग्लंडशी झाला होता आणि ओल्ड ट्रॅफर्डवर झालेल्या त्या लढतीत भारताने विजय मिळवला होता.  

अंतिम सामन्यात भारत-वेस्ट इंडिज समोरासमोर आले. विंडीजने नाणेफेक जिंकून भारताला प्रथम फलंदाजीचे आमंत्रण दिले होते. वेस्ट इंडिजच्या आग ओकणाऱ्या गोलंदाजांसमोर भारताला 54.4 षटकांत 183 धावाच करता आल्या. भारताकडून के श्रीकांतने सर्वाधिक 38 धावा केल्या होत्या, तर मोहिंदर अमरनाथ ( 26) आणि संदीप पाटिल ( 27) यांनी योगदान दिले. विंडीजच्या अँडी रॉबर्ट्सने तीन विकेट्स घेतल्या.

भारताच्या 183 धावांचा पाठलाग करताना विंडीजचा संपूर्ण संघ 52 षटकांत 140 धावांत माघारी परतला. विंडीजकडून व्हिव्हियन रिचर्ड्स यांनी सर्वाधिक 33 धावा केल्या, तर जेफ ड्यूजोने 25 धावा केल्या. भारताकडून मदन लाल व मोहिंदर अमरनाथ यांनी प्रत्येकी 3 विकेट्स घेतल्या. या सामन्यात अष्टपैलू खेळी करणाऱ्या अमरनाथ यांना मॅन ऑफ दी मॅचच्या पुरस्काराने गौरविण्यात आले.

टॅग्स :वर्ल्ड कप 2019कपिल देव