इंटरनेटनमेंटच्या चक्रव्युहात अडकलेला क्रिकेट हा खेळ आता फक्त फलंदाजांसाठी उरला, असे अनेकदा वाटते. ट्वेंटी-20 फॉरमॅटच्या आगमनानंतर तर गोलंदाजांचे उरलंसुरलं महत्त्वही कमी केलं. एखाद्या सामन्यातच गोलंदाज वरचढ ठरताना आता पाहायला मिळत आहेत. आला चेंडू की हाणा, त्यामुळे गोलंदाजानं कितीही टिच्चून मारा केला तरी फलंदाज तो भिरकावून लावतोच. पण, एक काळ असा होता की गोलंदाजांच्या जलद माऱ्याचा सामना करण्यासाठी फलंदाज धजावत नव्हते. त्यात वेस्ट इंडिज गोलंदाजांचा सामना करणे म्हणजे मोठं आव्हानच... त्यामुळे विंडीजच्या गोलंदाजांनी अनेकदा अविश्वसनीय गोलंदाजी केल्याचा इतिहास आहे.
आज आपण अशाच एका OMG अर्थात अविश्वसनीय कामगिरीबद्दल जाणू घेणार आहे. 30 जानेवारी 1993चा तो कसोटी सामना होता. बरोबर 27 वर्षांपूर्वी आजच्याच दिवशी वेस्ट इंडिजचे दिग्गज गोलंदाज सर कर्टली अँम्ब्रोस यांनी ऑस्ट्रेलियाला त्यांच्याच घरच्या प्रेक्षकांसमोर हतबल करून सोडले होते. वेस्ट इंडिजनं तो सामना एक डाव व 25 धावांनी जिंकला होता. प्रथम फलंदाजी करताना ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव 119 धावांत गुंडाळला, प्रत्युत्तरात विंडीजनं पहिल्या डावात 322 धावा केल्या. पण, दुसऱ्या डावातही ऑसींची घसरगुंडी कायम राहिली आणि त्यांचा संपूर्ण संघ 178 धावांत माघारी परतला.
या सामन्यात अँम्ब्रोस यांनी अविश्वसनीय स्पेल टाकला होता. ऑस्ट्रेलियाच्या पहिल्या डावात अँम्ब्रोस यांनी 7 विकेट्स घेतल्या. विशेष म्हणजे अँम्ब्रोस यांनी एका स्पेलमध्ये 32 चेंडूंत केवळ 1 धावा देताना या सात विकेट्स घेतल्या होत्या. एकंदरीत त्यांनी पहिल्या डावात 18 षटकांत 25 धावा देत 7 विकेट्स घेतल्या.
पाहा व्हिडीओ...
संक्षिप्त धावफलक
ऑस्ट्रेलिया- पहिला डाव - 119 ( डेव्हिड बून 44; कर्टली अँम्ब्रोस 7/25, इयान बिशॉप 2/17) आणि दुसरा डाव - 178 ( डेव्हिड बून 52; इशाय बिशॉप 6/40, कर्टली अँम्ब्रोस 2/54) पराभूत वि. वेस्ट इंडिज - 322 ( फिल सिमॉन्स 80, केथ ऑर्थरटन 77, रिची रिचर्डसन 47; मेर्व्ह ह्युजेस 4/71, क्रेग मॅकडेर्मोट 3/85); एक डाव व 25 धावांनी विजयी
कर्टली अँम्ब्रोस
कसोटी - 98 सामने, 1439 धावा, 405 विकेट्स, सर्वोत्तम - 8/45
वन डे - 176 सामने, 639 धावा, 225 विकेट्स, सर्वोत्तम - 5/17
Web Title: On this day in 1993, the legendary Curtly Ambrose produced one of the most devastating spells of fast-bowling ever seen with 7-1 in 32 balls
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.