ट्वेंटी-20 क्रिकेटच्या आगमनानंतर फलंदाजांच्या फटकेबाजीनं अधिक वेग पकडला. त्यामुळे वन डे क्रिकेट असो किंवा कसोटी धावांचा पाऊस पडलेला पाहायला मिळत आहे. त्यामुळेच वन डे क्रिकेटमध्येही विक्रमांची आतषबाजी होताना दिसते. वन डे क्रिकेटमध्ये द्विशतकी खेळी, हे स्वप्न क्वचितच कोणी पाहिले असेल. मात्र, आतापर्यंत पुरुषांच्या वन डे क्रिकेटमध्ये आठ द्विशतकी खेळी पाहायला मिळाली आहेत आणि त्यापैकी तीन द्विशतकं ही टीम इंडियाच्या रोहित शर्माच्या नावावर आहेत. रोहितच्या आधी महान फलंदाज सचिन तेंडुलकरनं भारताकडून पहिल्या द्विशतकाची नोंद केली होती. महिला क्रिकेटपटूंच्या नावावरही वन डे क्रिकेटमध्ये दोन द्विशतकी खेळी आहेत. आता एक सोपा प्रश्न... वन डे क्रिकेटमधील पहिले द्विशतक कोणाच्या नावावर आहे? आमचा दावा आहे की अनेकांची उत्तर चुकतील... चला तर मग जाणून घेऊया उत्तर...
वन डे क्रिकेटमध्ये सर्वाधिक द्विशतकांचा विक्रम हिटमॅनच्या नावावर आहे. त्यानं तीन वेळा वन डे क्रिकेटमध्ये द्विशतकं झळकावली आहेत. 2 नोव्हेंबर 2013मध्ये रोहितनं बंगळुरू वन डे सामन्यात ऑस्ट्रेलियाविरुद्ध 209 धावांची खेळी केली होती. त्यानंतर 13 नोव्हेंबर 2014 मध्ये कोलकाता येथे श्रीलंकेच्या गोलंदाजांची धुलाई करताना त्यानं 264 धावा चोपल्या होत्या. वन डे क्रिकेटमधील ही सर्वोत्तम वैयक्तीक खेळी आहे. 13 डिसेंबर 2017मध्ये श्रीलंकेविरुद्धच मोहाली येथे झालेल्या सामन्यात त्यानं तिसरं ( 208*) द्विशतक झळकावलं.
वन डे क्रिकेटमध्ये सर्वोत्तम वैयक्तिक खेळी करणाऱ्या फलंदाजांत न्यूझीलंडच्या मार्टिन गुप्तील दुसऱ्या स्थानी आहे. त्यानं 21 मार्च 2015 मध्ये वेलिंग्टन येथे झालेल्या सामन्यात वेस्ट इंडिजविरुद्ध 163 चेंडूंत 24 चौकार व 11 षटकार खेचून नाबाद 237 धावा कुटल्या होत्या.
भारताच्या वीरेंद्र सेहवागचाही या पंक्तित समावेश आहे. त्यानं 8 डिसेंबर 2011मध्ये वेस्ट इंडिजविरुद्ध 149 चेंडूंत 25 चौकार व 7 षटकारांसह 219 धावांची खेळी केली होती.
द्विशतकाची चर्चा आणि त्यात युनिव्हर्स बॉस ख्रिस गेलचं नाव नसेल तर आश्चर्यच म्हणावं लागेल. 24 फेब्रुवारी 2015मध्ये झिम्बाब्वेविरुद्ध त्यानं 147 चेंडूंत 215 धावा चोपल्या होत्या. त्यात 10 चौकार आणि 16 षटकारांचा समावेश होता.
पाकिस्तानकडून वन डेत पहिल्या द्विशतकाचा मान फखर जमाननं मिळवला. गेल्या वर्षी झिम्बाब्वेविरुद्ध त्यानं 156 चेंडूंत नाबाद 210 धावा केल्या होत्या. त्यात 24 चौकार व 5 षटकारांचा समावेश होता.
भारताकडून पहिले द्विशतक हे महान फलंदाज सचिन तेंडुलकरनं झळकावलं. 24 फेब्रुवारी 2010 मध्ये ग्वालियर सामन्यात तेंडुलकरनं दक्षिण आफ्रिकेविरुद्ध ही अविस्मरणीय खेळी खेळली होती. त्यानं 147 चेंडूंत 25 चौकार व 3 षटकार खेचून नाबाद 200 धावा केल्या होत्या.
महिला क्रिकेटपटूंत न्यूझीलंडच्या अॅमेलिया केर हिचे नाव आहे. 13 जून 2018मध्ये आयर्लंडविरुद्ध तिनं द्विशतकी खेळी केली होती. तिनं 145 चेंडूंत 31 चौकार व 2 षटकार खेचून नाबाद 232 धावा चोपल्या होत्या.
पण, या सर्व द्विशतकांपूर्वी म्हणजेच 1997 मध्ये वन डे क्रिकेटमधल्या पहिल्या द्विशतकाची नोंद झाली होती आणि हा विश्वविक्रम एका महिला क्रिकेटपटूनं नोंदवला होता. ऑस्ट्रेलियाची बेलिंडा क्लार्कच्या नावावर हा विक्रम आहे. 16 डिसेंबर 1997मध्ये तिनं मुंबईत हा पराक्रम केला होता. डेन्मार्कच्या गोलंदाजांची धुलाई करताना तिनं 155 चेंडूंत 22 चौकारांच्या मदतीनं नाबाद 229 धावा चोपल्या होत्या.