क्रिकेटचा देव, मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरसाठी आजचा दिवस खास आहे. क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात यशस्वी फलंदाज म्हणून सचिननं जगभरात त्याचा चाहतावर्ग बनवला आहे. कसोटी क्रिकेट ( 15921 धावा) आणि वन डेत (18426 धावा ) मळून 33 हजाराहून अधिक धावा करणारा एकमेव फलंदाज. शंभर आंतरराष्ट्रीय शतकं नावावर असलेला एकमेव फलंदाज आदी अनेक विक्रम सचिनच्या नावावर आहेत. 2011मध्ये मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर वन डे वर्ल्ड कप जिंकल्यानंतर सचिनला खांद्यावर उचलून काढलेली मिरवणूक असो किंवा शारजाह येथील ऑस्ट्रेलियाविरुद्धची त्याची वादळी खेळी. सचिननं असे अनेक अविस्मरणीय क्षण भारतीयांना अनुभवायला दिले. त्यामुळे आजही ते क्षण डोळ्यासमोर ताजे वाटतात... सचिननं जगाला क्रिकेटच्या प्रेमात पडण्यास भाग पाडले. अशा या सचिनसाठी आणि एकूणच वन डे क्रिकेटच्या इतिहासात आजच्या दिवसाचे अनन्यसाधारण महत्त्व आहे.
असं काय आहे आज?
ही गोष्ट आजची नाही, तर दहा वर्षांपूर्वीची आहे. 24 फेब्रुवारी 2010.... वन डे क्रिकेटमध्ये ही तारीख कोणीच विसणार नाही. एक भारतीय आणि सच्चा क्रिकेटप्रेमी तर अजिबात नाही. आजच्या दिवशी पुरुषांच्या वन डे क्रिकेटमध्ये ऐतिहासिक कामगिरीची नोंद झाली होती आणि तो ऐतिहासिक क्षण हा सचिन तेंडुलकरमुळे अनुभवायला मिळाला होता. पुरुषांच्या वन डे क्रिकेटमध्ये पहिले द्विशतक झळकावलं गेलं होतं, ते आजच्याच दिवशी. सचिनच्या नावावर हा विक्रम नोंदवला गेला. तेव्हा 36 वर्षीय सचिननं दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजांची चांगलीच धुलाई केली होती.
फ्लॅशबॅक
दक्षिण आफ्रिकेच्या भारत दौऱ्यातील तो दुसरा वन डे सामना होता. ग्वालियर येथे खेळवण्यात आलेल्या दिवसरात्र वन डे सामन्यात टीम इंडियानं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. वीरेंद्र सेहवाग आणि सचिन तेंडुलकर ही जोडी मैदानावर उतरली. तीन सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना जिंकल्यानं या लढतीत टीम इंडियावर कोणतंही दडपण नव्हतं. पण, सेहवाग चौथ्याच षटकात माघारी परतला. त्यानंतर आलेल्या दिनेश कार्तिकनं दुसऱ्या विकेटसाठी सचिनसह 194 धावांची भागीदारी केली. कार्तिक 85 चेंडूंत 4 चौकार व 3 षटकार मारून 79 धावांत माघारी परतला. त्यानंतर सचिननं तिसऱ्या विकेटसाठी युसूफ पठाणसह 81 आणि चौथ्या विकेटसाठी महेंद्रसिंग धोनीसह नाबाद 101 धावांची भागीदारी केली. पठाणने 23 चेंडूंत 4 चौकार व 2 षटकार खेचून 36 धावा केल्या, तर धोनी 35 चेंडूंत 7 चौकार व 4 षटकारांसह 68 धावांवर नाबाद राहिला.
पण, यात सर्वात सचिनची खेळी अविस्मरणीय ठरली. सचिननं 147 चेंडूंत 25 चौकार व 3 षटकार खेचून नाबाद 200 धावा केल्या. सचिनच्या या द्विशतकात 100 धावा या चौकारांनीच आल्या. पुरुष क्रिकेटमध्ये द्विशतक झळकावणारा सचिन हा पहिलाच फलंदाज ठरला. त्याच्या या फटकेबाजीच्या जोरावर टीम इंडियानं 3 बाद 401 धावा चोपल्या. प्रत्युत्तरात आफ्रिकेचा संघ 42.5 षटकांत 248 धावांत तंबूत परतला.
पाहा व्हिडीओ...
Web Title: On This Day in 2010, Sachin Tendulkar's became the First Man to score a Double Hundred in ODI Cricket
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.