Join us  

दिवस-रात्र सामन्यात परिस्थितीनुसार जुळवून घ्यावे लागते - बुमराह

अनुभव मिळाला, त्यानुसारच आम्ही वाटचाल करणार

By ऑनलाइन लोकमत | Published: March 12, 2022 5:32 AM

Open in App

बंगळुरु : ‘आतापर्यंत खेळलेल्या दिवस-रात्र कसोटी सामन्यांत परिस्थिती वेगवेगळी होती. गुलाबी चेंडूने खेळताना मानसिकरित्या ताळमेळ साधणे महत्त्वाचे असते. मात्र, यासाठी निर्धारित रुपरेषा नाही. त्यामुळे अशा सामन्यात असलेल्या परिस्थितीनुसार ताळमेळ साधून खेळावे लागते’, असे भारताचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह म्हणाला. आतापर्यंत भारताने तीन दिवस-रात्र कसोटी सामने खेळले आहेत. बांग्लादेशविरुद्ध कोलकाता येथे झालेल्या सामन्यात खेळपट्टी वेगवान गोलंदाजीला पोषक होती. त्यानंतर ऑस्ट्रेलियात ॲडलेड येथील खेळपट्टी उसळणारी होती, तर इंग्लंडविरुद्ध अहमदाबाद येथे झालेल्या दिवस-रात्र कसोटी सामन्यात फिरकीला पोषक असलेली खेळपट्टी होती. ‘गुलाबी चेंडूने खेळताना सर्वच संघ अद्याप नव्या गोष्टी शिकत आहेत’, असेही बुमराहने सांगितले. 

लंकेविरुद्धच्या दुसऱ्या सामन्याआधी बुमराह म्हणाला की, ‘व्यावसायिक क्रिकेटपटू म्हणून आम्हाला परिस्थितीनुसार वेगाने बदलावे लागेल. गुलाबी चेंडू क्षेत्ररक्षणादरम्यान वेगळा वाटला. तुम्ही जसा अंदाज बांधता, त्याहून लवकर हा चेंडू येतो. दुपारी भलेही स्विंग न मिळो, पण संध्याकाळी हा चेंडू स्विंग होतो. 

अशा अनेक छोट्या-छोट्या गोष्टी आहेत. आम्ही गुलाबी चेंडूने फार खेळलेलो नाही. जेव्हा कधी या चेंडूने खेळलो, तेव्हा नेहमी परिस्थिती वेगळी ठरली आहे.’बुमराह पुढे म्हणाला की, ‘आतापर्यंत जो काही अनुभव मिळाला आहे, त्यानुसारच आम्ही वाटचाल करणार आहोत. आम्हाला गुलाबी चेंडूने गोलंदाजी, फलंदाजी आणि क्षेत्ररक्षण करण्याची सवय नाही. गुलाबी चेंडूने आम्ही खेळत नाही. प्रकाशझोतात क्षेत्ररक्षण करताना अनेक गोष्टी लक्षात घ्याव्या लागतात. दिवस-रात्र कसोटी सामन्यात आम्ही अजूनही नवखे आहोत.’

Open in App