कोलकाता - विराट कोहलीने गुलाबी चेंडूचे आव्हान सक्षमपणे पेलताना शनिवारी येथे शानदार शतक झळकाविले आणि त्यानंतर भारताच्या वेगवान गोलदाजांनी बांगलादेशची आघाडीची फळी माघारी परतवत दुसरा व अखेरचा कसोटी सामना झटपट संपविण्याच्या दिशेने वाटचाल केली. बांगलादेशने दुसऱ्या दिवसअखेर दुसºया डावात ६ बाद १५२ धावांची मजल मारली आहे. डावाने पराभव टाळण्यासाठी त्यांना अद्याप ८९ धावांची गरज आहे. भारतातर्फे आतापर्यंत ईशांत शर्माने ३९ धावांत ४, तर उमेश यादवने ४० धावांत २ बळी घेतले. मुशफिकूरचा अपवाद वगळता महमुदुल्लाह (रिटायर्ड हर्ट ३९) भारतीय गोलंदाजांना तोंड देण्यात यशस्वी ठरला.
त्याआधी, कोहलीने १९४ चेंडूंना सामोरे जाताना १३६ धावा केल्या. तो दिवस-रात्र कसोटीत शतक ठोकणारा पहिला भारतीय फलंदाज ठरला आहे. भारताने आपला पहिला डाव ९ बाद ३४७ धावांवर घोषित केला. भारताने पहिल्या डावात २४१ धावांची आघाडी घेतली.
पहिल्या डावात केवळ १०६ धावा करणाºया बांगलादेशची दुसºया डावात पुन्हा एकदा निराशाजनक सुरुवात झाली. दुसºया दिवशी चहापानाच्या विश्रांतीपर्यंत त्यांची २ बाद ७ अशी अवस्था झाली होती. हे दोन्ही बळी ईशांत शर्माने घेतले. भारताने मायदेशात सलग १२ वी मालिका जिंकण्याच्या दिशेने वाटचाल केली आहे.
भारतीय वेगवान गोलंदाजांनी पुन्हा एकदा वर्चस्व गाजविले. मोहम्मद मिथुन डोक्याला मार लागणारा तिसरा फलंदाज ठरला. तो ईशांतच्या बाऊंसरवर जखमी झाला. त्याआधी मोहम्मद शमीच्या बाऊंसरवर त्यांचे दोन फलंदाज (लिटन दास व नईम हसन) दुखापतग्रस्त झाले आहे. त्यांच्या स्थानी बदली खेळाडूंना संधी द्यावी लागली.
भारताने दुसºया डावाच्या सुरुवातीला स्लिपमध्ये चार क्षेत्ररक्षक तैनात करीत आपला निर्धार स्पष्ट केला. ईशांतने शादमान इस्लामला पायचीत करीत भारताला पहिले यश मिळवून दिले. त्यावेळी बांगलादेशने दुस-या डावात खातेही उघडले नव्हते. त्यानंतर ईशांतने बांगलादेशचा कर्णधार मोमिनुल हकला खाते उघडण्यापूर्वीच बाद केले.
त्याआधी, कालच्या ५९ धावसंख्येवरून कोहलीने पुढे खेळण्यास सुरुवात केली. फॉर्मात असलेल्या कोहलीने आपले २७ वे कसोटी शतक झळकावले. कोहलीने ताइजुल इस्लामच्या गोलंदाजीवर स्केअर लेगला फटका लगावत शतक पूर्ण केले. उपकर्णधार अजिंक्य रहाणेने ५१ धावांची खेळी केली.
कसोटी क्रिकेटमध्ये कर्णधार म्हणून ५ हजार धावांचा पल्ला पूर्ण करणारा पहिला भारतीय ठरलेल्या कोहलीने कारकिर्दीतील ७०वे आंतरराष्ट्रीय शतक झळकाविले. शतक झळकाविल्यानंतर त्याने आक्रमक पवित्रा स्वीकारला. त्याने अबू जायेदच्या गोलंदाजीवर सलग चार चौकार वसूल केले. ताईजुलने सीमारेषेवर त्याचा शानदार झेल टिपत कोहलीची खेळी संपुष्टात आणली. कोहलीच्या खेळीत १८ चौकारांचा समावेश आहे. कोहलीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये तिन्ही प्रकारच्या क्रिकेटमध्ये कर्णधार म्हणून सर्वांधिक ४१ शतके ठोकताना आॅस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पॉन्टिंगच्या विक्रमाची बरोबरी केली. कोहलीने त्याच्या तुलनेत अर्ध्या डावांमध्ये (१८८) ही कामगिरी केली.
भारताची २ बाद ४३ अशी स्थिती असताना कोहली खेळपट्टीवर आला. कर्णधाराने सावध पवित्र घेत ईडन गार्डन्सवर सलग दुसरे शतक झळकाविले. त्याने नोव्हेंबर २०१७ मध्ये श्रीलंकेविरुद्धची शतकी खेळी केली होती. कोहली बाद झाल्यानंतर भारताच्या तळाच्या फलंदाजांना अधिक टिकाव धरता आला नाही. त्यानंतर कर्णधाराने डाव घोषित करण्याचा निर्णय घेतला. बांगलादेशतर्फे इबादत हुसेन व अल अमीन हुसेन यांनी प्रत्येकी तीन, तर अबू जायेदने दोन बळी घेतले.
त्याआधी, माजी विश्वविजेता विश्वनाथन आनंद व सध्याचा चॅम्पियन मॅग्नस कार्लसन यांनी ईडनवर घंटा वाजवीत दुस-या दिवसाच्या खेळाची सुरुवात केली.
भारताकडून पहिले कसोटी शतक लाला अमरनाथ (१९३३) यांनी झळकाविले होते. एकदिवसीय सामन्यात कपिल देव यांनी (१९८३) मध्ये पहिले शतक झळकाविले. दिवस-रात्र एकदिवसीय सामन्यात संजय मांजरेकर (१९९१) यांनी पहिले शतक झळकाविले. टी-२० मध्ये पहिले शतक सुरेश रैना (२०१०)च्या नावावर आहे, तर दिवस-रात्र टी-२० मध्ये रोहित शर्मा (२०१५)ने हा पराक्रम केला आहे.
विक्रमवीर
१ - कोहलीने पहिल्या दिवस-रात्र कसोटी सामन्यात शतक झळकावीत अनेक विक्रमांना साद घातली. दिवस-रात्र कसोटी सामन्यात शतक झळकाविणारा विराट पहिला भारतीय खेळाडू ठरला आहे.
२ - आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये कर्णधार या नात्याने विराट कोहलीचे हे ४१ वे शतक आहे. या कामगिरीसह विराट कोहलीने माजी आॅस्ट्रेलियन कर्णधार रिकी पाँटिंगशी (४१ शतके) बरोबरी केली आहे.
३ - कर्णधार विराट कोहलीने सचिन तेंडुलकरच्या विक्रमाशी बरोबरी केली आहे. कसोटी क्रिकेटमध्ये सर्वात कमी डावांत २७ शतके झळकाविण्याच्या सचिनच्या विक्रमाशी विराटने बरोबरी केली आहे. विराटने १४१ डावांत २७ वे शतक झळकावले.
४ - इंग्लंडचा कसोटी संघाचा कर्णधार जो रुटच्या दिवस-रात्र कसोटीत सर्वाधिक धावा करण्याच्या विक्रमाशी विराटने बरोबरी केली आहे. जो रुटने २०१७ साली दिवस-रात्र कसोटीत १३६ धावा केल्या होत्या. विराटने आॅस्ट्रेलियाचा माजी कर्णधार स्टिव्ह स्मिथचा १३० धावांचा विक्रम मोडला.
५- विराट दिवस-रात्र कसोटीत शतक झळकाविणारा पाचवा कर्णधार ठरला. यापूर्वी फाफ डूप्लेसिस (द. आफ्रिका), स्टिव्ह स्मिथ (आॅस्ट्रलिया), ज्यो रुट (इंग्लंड), केन विल्यम्सन (न्यूझीलंड) यांनी हा पराक्रम केला आहे.
६- भारतात सर्वाधिक कसोटी शतके झळकाविणा-या फलंदाजाच्या यादीत विराट दहाव्या क्रमांकावर आला. त्याने सुनील गावसकरांच्या नऊ कसोटी शतकांचा विक्रम मोडला.
Web Title: Day and Night Test: India on the verge of victory
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.