अॅडलेड/अबु धाबी : भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया आणि पाकिस्तान विरुद्ध न्यूझीलंड यांच्यात विविध ठिकाणी सुरू असलेल्या कसोटी सामन्यात गुरुवारी अजब योगायोग जुळून आला. ऑस्ट्रेलियाविरुद्ध भारतीय संघ आणि पाकिस्तानविरुद्धन्यूझीलंडचा संघ अडचणीत सापडला असताना त्यांच्यासाठी तिसऱ्या क्रमांकाचा फलंदाज धावून आला. भारताच्या चेतेश्वर पुजारा आणि न्यूझीलंडच्या केन विलियम्सन यांनी आपापल्या संघांसाठी गुरुवारी Super Saver Inning खेळली.
अॅडलेड कसोटीच्या पहिल्या दिवशी पुजाराने भारतीय संघाची लाज राखली. त्याने ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांचा चांगलाच समाचार घेतला. पुजाराने 246 चेंडूंत 7 चौकार व दोन षटकार खेचून 123 धावांची महत्त्वपूर्ण खेळी केली. त्याच्या या खेळीच्या जोरावर भारताने पहिल्या दिवसअखेर 9 बाद 250 धावा केल्या. पुजाराची ही अविस्मरणीय खेळी पॅट कमिन्सच्या चपळ क्षेत्ररक्षणाने संपुष्टात आणली. 88 व्या षटकाच्या पाचव्या चेंडूवर पुजारा धावबाद होऊन माघारी परतला आणि पंचांनी पहिल्या दिवसाचा खेळ संपल्याचे जाहीर केले. 4 बाद 41 अशा दयनीय अवस्थेत सापडलेल्या भारतीय संघाच्या मदतीला पुजारा धावून आला. पुजाराने रोहित शर्मा (45 धावांची भागीदारी), रिषभ पंत ( 41 ), आर अश्विन ( 62), मोहम्मद शमी ( 40) यांच्यासह उपयुक्त भागीदारी केल्या.