मुंबई - 24 सप्टेंबर 2007. दक्षिण आफ्रिकेतील जोहान्सबर्गमधील वाँडरर्सचे मैदान, पहिल्याच टी-20 विश्वचषकाची अंतिम लढत, समोर पाकिस्तानसारखा कट्टर प्रतिस्पर्धी, अत्यंत अटीतटीची झालेली लढत, सामन्याचे पारडे कधी तर कधी तिकडे झुकत असताना नवोदित कर्णधार महेंद्रसिंह धोनीने अत्यंत शांतपणे हाताळलेली परिस्थिती. त्यातही चतुर चाल खेळत शेवटचे षटक टाकण्यासाठी जोगिंदर शर्माच्या हाती दिलेला चेंडू, समोर मिसबाह उल हकसारखा स्फोटक फलंदाज आणि सेकंदागणिक कोट्यवधी भारतीयांचा रोखला जात असलेला श्वास. अशा परिस्थितीत शेवटच्या षटकातील तिसऱ्या चेंडूवर श्रीशांतने मिसबाह उल हकचा उंच उडालेला झेल श्रीशांतने टिपला आणि संपूर्ण देशात एकच जल्लोष झाला होता. आज या विजयाला 12 वर्षे पूर्ण झाली. पण आजही विश्वविजेतेपदाचे ते क्षण आठवले की क्रिकेटप्रेंमींचे मन गर्वाने भरून जाते.
वेस्ट इंडियमध्ये झालेल्या क्रिकेट विश्वचषकात भारतीय संघाला पहिल्याच फेरीत गाशा गुंडाळावा लागला होता. त्यामुळे क्रिकेटप्रेमींमध्ये निराशेचे वातावरण होते. अशा परिस्थितीत दक्षिण आफ्रिकेत होत असलेल्या पहिल्या वहिल्या टी-20 विश्वचषक स्पर्धेसाठी भारताने महेंद्रसिंह धोनीच्या नेतृत्वाखाली युवा खेळाडूंचा संघ पाठवला होता. या संघाकडून चांगल्या कामगिरीची फारशी अपेक्षाही बाळगलेली नव्हती. पण धोनीच्या नेतृत्वाने कमाल केली आणि एक एक अडथळा पार करत भारतीय संघाने अंतिम फेरीपर्यंत मुसंडी मारली. त्यापूर्वी युवराज सिंहचे सहा षटकार, ऑस्ट्रेलियाविरुद्ध सेमीफायनमध्ये मिळवलेला दणकेबाज विजय, यामुळे क्रिकेटप्रेमींच्या अपेक्षा आपसुकच वाढल्या होत्या. अंतिम फेरीत पाकिस्तान हा कट्टर प्रतिस्पर्धी समोर असल्याने क्रिकेटप्रेमींना उत्साहाचे भरते आले होते. पण अंतिम फेरीत पाकिस्तानच्या भेदक माऱ्यासमोर भारताची फलंदाजी कोलमडली होती. पण गौतम गंभीरच्या 75 धावा आणि शेवटच्या षटकांमध्ये रोहित शर्माने केलेल्या फटकेबाजीच्या जोरावर भारताने 157 धावांपर्यंत मजल मारली होती. त्यानंतर आरपी सिंह, इरफान पठाण आणि जोगिंदर शर्मा यांनी केलेल्या भेदक माऱ्यासमोर पाकिस्तानची दाणादाण उडाली. 12 व्या षटकात त्यांची अवस्था 6 बाद 77 अशी झाली होती. मात्र विस्फोटक मिसबाह उल हकने तुफानी फटकेबाजी करून सामन्याचे चित्रच पालटवून टाकले होते. एस. श्रीशांत आणि हरभजन सिंहला त्याचा फटकेबाजीचा चांगलाच प्रसाद मिळाला होता. सामन्याचे पारडेही पूर्णपणे पाकिस्तानच्या बाजूने झुकले होते. अशा परिस्थितीत महेंद्रसिंह धोनीने एक वेगळीच चाल खेळली. त्याने शेवटचे षटक टाकण्यासाठी जोगिंदर शर्माला पाचारण केले. पण त्याने टाकलेल्या पहिल्या दोन चेंडूत मिसबाने सात धावा वसूल केल्या. त्यामुळे पाकिस्तानचा संघ विजयासमिप पोहोचला. मात्र षटकातील तिसऱ्या चेंडूवर एक उत्तुंग फटका मारण्याचा मिसबाहचा प्रयत्न फसला आणि उंच उडालेला झेल श्रीशांतच्या हाता जाऊन विसावला. त्याबरोबरच क्रिकेटला टी-20 क्रिकेटचा भारताच्या रूपात पहिला विश्वविजेता मिळाला. भारताचे टी-20 क्रिकेटमधील हे पहिले आणि आत्तापर्यंतचे एकमेव विजेतेपद आहे.