नवी दिल्ली- फिरोजशहा कोटला मैदानावर सुरू असलेल्या सामन्याच्या दुस-या दिवसाचा खेळ समाप्त झाला आहे. श्रीलंकेनं दुस-या दिवशी 3 बाद 131 धावा केल्या आहेत. श्रीलंका अद्यापही भारतापासून 405 धावांनी पिछाडीवर आहे. भारतीय गोलंदाजांनी यावेळी श्रीलंकेच्या फलंदाजांना डोके वर काढण्याची संधीच दिली नाही. मोहम्मद शमीनं साहाकरवी श्रीलंकन सलामीवीर दिमूथ करुणारत्नेला बाद केलं. त्यानंतर मैदानावर आलेल्या डी सिल्व्हाला वेगवान गोलंदाज इशांत शर्मानं माघारी धाडत श्रीलंकेला दुसरा दणका दिला. परंतु निसटत चाललेला सामना श्रीलंकेच्या अँजेलो मॅथ्यूज व परेरानं काहीसा सावरला. परेरानं 54 चेंडूंत 9 चौकारांसह 42 धावा केल्या. त्यालाही जडेजानं पायचीत केले. श्रीलंकेकडून मॅथ्यूजनंही दमदार खेळी करत 118 चेंडूंत 8 चौकार आणि 2 षटकारांसह 57 धावांसह नाबाद अर्धशतक केलं. चंडिमलनंही 3 चौकारांसह नाबाद राहत 25 धावा केल्या आहेत.
तत्पूर्वी तिसऱ्या कसोटीत भारतीय फलंदाजांनी श्रीलंकेवर वरचष्मा गाजवत आपला पहिला डाव 7 बाद 536 धावांवर घोषित केला होता. आज कर्णधार विराट कोहलीने फटकावलेले झंझावाती द्विशतक आणि पहिल्या दिवशी मुरली विजयने ठोकलेले दीडशतक ही भारताच्या डावाची वैशिष्ट्ये ठरली. दरम्यान, श्रीलंकेच्या डावास निराशाजनक सुरुवात झाली होती. श्रीलंकन फलंदाजांना यावेळी फारशी चमक दाखवता आलेली नाही. आज भारताने कालच्या 4 बाद 371 वरून पुढे खेळण्यास सुरुवात केल्यावर विराट कोहली आणि रोहित शर्माने श्रीलंकेच्या गोलंदाजांची यथेच्छ धुलाई केली. त्यामुळे पहिल्या सत्रात श्रीलंकेच्या गोलंदाजांवर दबाव राहिला. दरम्यान विराटने आपले कसोटी कारकिर्दीतील सहावे द्विशतक पूर्ण केले. तर रोहितनेही अर्धशतकाला गवसणी घातली. दोघांनीही पाचव्या विकेटसाठी 135 धावांची भागीदारी करत संघाला 500 धावांचा टप्पा ओलांडून दिला.उपाहाराला काही वेळ असतानाच रोहित 65 धावा काढून बाद झाला.उपाहारानंतर विराट कोहली त्रिशतकी मजल मारणार अशी अपेक्षा होती. मात्र ऐन मध्यान्ही मैदानात आलेले धुरके आणि त्याचे निमित्त करून श्रीलंकन खेळाडूंनी खेळास चालढकल करण्यास केलेली सुरुवात यामुळे विराटची लय बिघडली. त्यातच अश्विन आणि विराट (243) पाठोपाठ बाद झाले. अखेरीच विराटने भारताचा डाव 7 बाद 536 धावांवर घोषित केला. तत्पूर्वी, खेळाच्या पहिल्या दिवशी कर्णधार विराट कोहलीचे सलग तिसरे आणि सलामीवीर मुरली विजयच्या सलग दुस-या शतकाच्या बळावर भारताने तिस-या कसोटीच्या पहिल्याच दिवशी लंकेविरुद्ध वर्चस्व मिळवित ९० षटकांत ४ बाद ३७१ धावा उभारल्या. दोघांनी तिस-या गड्यासाठी २८३ धावांची भागीदारीही केली. भारताच्या दोन फलंदाजांनी दिवसभरात प्रत्येकी दीडशे धावा ठोकण्याची ही पहिलीच वेळ आहे. भारताने पहिल्या सत्रात २७ षटकांत दोन गड्यांच्या मोबदल्यात ११६, दुस-या सत्रात ३० षटकांत गडी न गमाविता १२९ आणि तिस-या सत्रात ३३ षटकांत दोन गड्यांच्या मोबदल्यात १२६ धावा वसूल केल्या. फलंदाजीला अनुकूल वाटणाºया कोटलाच्या खेळपट्टीवर नाणेफेकीचा कौल जिंकताच कोहलीने फलंदाजी घेतली होती.