Indian Premier League ( IPL 2020) च्या १३व्या पर्वातील गुणतालिकेत अव्वल स्थानी असलेल्या दिल्ली कॅपिटल्सने ( Delhi Capitals) नाणेफेक जिंकून कोलकाता नाईट रायडर्स ( Kolkata Knight Riders) संघाला प्रथम फलंदाजीचे आमंत्रण दिले आहे. करो वा मरो सामन्यात KKRची सुरुवात निराशाजनक झाली. आघाडीचे तीन फलंदाज माघारी परतल्यानंतर नितिश राणा आणि सुनील नरीन यांनी विक्रमी भागीदारी करताना संघाला मोठा पल्ला गाठून दिला.
प्रथम फलंदाजीला आलेल्या KKR ला साजेशी सुरुवात करता आली नाही. शुबमन गिल ( ९), राहुल त्रिपाठी ( १३) आणि दिनेश कार्तिक ( ३) यांना अपयश आले. नितिश राणा व संघात पुनरागमन करणाऱ्या सुनील राणा यांनी चौथ्या विकेटसाठी शतकी भागीदारी केली. राणानं ३५, तर नरीननं २४ चेंडूंत वैयक्तिक अर्धशतक पूर्ण केले. अर्धशतक पूर्ण केल्यानंतर नितिश राणानं सुरींदर नावाची जर्सी मैदानावर झळकावून आकाशाकडे हात जोडले. Emotional; नितिश राणानं अर्धशतकानंतर का दाखवली 'सुरींदर' नावाची जर्सी?
१७व्या षटकात कागिसो रबाडानं ११५ धावांची ही भागीदारी संपुष्टात आणली. नरीन ३२ चेंडूंत ६ चौकार व ४ षटकार खेचून ६४ धावांवर माघारी परतला. नरीननं आजच्या सामन्यात IPLमधील ५० षटकार व १०० चौकारांचा पल्लाही ओलांडला. राणा व नरीन यांनी चौथ्या विकेटसाठी KKRसाठी दुसरी सर्वोत्तम भागीदारी नोंदवली. यात रॉबीन उथप्पा/शकिब अल हसन यांनी २०१४मध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूविरुद्ध १२१ धावांची भागीदारी अव्वल आहे. तिसऱ्या स्थानावर रॉबीन उथप्पा/आंद्रे रसेल यांची ११२* ( वि. चेन्नई सुपर किंग्स, २०१५) धावांची भागीदारी आहे. अखेरच्या षटकात राणा माघारी परतला. त्यानं ५३ चेंडूंत १३ चौकार व १ षटकारासह ८१ धावा चोपल्या. KKRनं २० षटकांत ६ बाद १९४ धावा केल्या.