Indian Premier League ( IPL 2020) च्या १३व्या पर्वातील गुणतालिकेत अव्वल स्थानी असलेल्या दिल्ली कॅपिटल्सने ( Delhi Capitals) नाणेफेक जिंकून कोलकाता नाईट रायडर्स ( Kolkata Knight Riders) संघाला प्रथम फलंदाजीचे आमंत्रण दिले आहे. करो वा मरो सामन्यात KKRची सुरुवात निराशाजनक झाली. आघाडीचे तीन फलंदाज माघारी परतल्यानंतर नितिश राणा आणि सुनील नरीन यांनी विक्रमी भागीदारी करताना संघाला मोठा पल्ला गाठून दिला. DCची सुरुवात निराशाजनक झाली. पण, रिषभ पंत व कर्णधार श्रेयस अय्यर यांनी डाव सावरला. पण, वरून चक्रवर्थीनं त्यांना एकामागून पाच धक्के दिले.
प्रथम फलंदाजीला आलेल्या KKR ला साजेशी सुरुवात करता आली नाही. शुबमन गिल ( ९), राहुल त्रिपाठी ( १३) आणि दिनेश कार्तिक ( ३) यांना अपयश आले. नितिश राणा व संघात पुनरागमन करणाऱ्या सुनील राणा यांनी चौथ्या विकेटसाठी ११५ धावांची भागीदारी केली. १७व्या षटकात कागिसो रबाडानं ही भागीदारी संपुष्टात आणली. नरीन ३२ चेंडूंत ६ चौकार व ४ षटकार खेचून ६४ धावांवर माघारी परतला. नरीननं आजच्या सामन्यात IPLमधील ५० षटकार व १०० चौकारांचा पल्लाही ओलांडला. राणानं ५३ चेंडूंत १३ चौकार व १ षटकारासह ८१ धावा चोपल्या. KKRनं २० षटकांत ६ बाद १९४ धावा केल्या.
प्रत्युत्तरात दिल्ली कॅपिटल्सची सुरुवात निराशाजनक झाली. अजिंक्य रहाणे (०) पहिल्याच चेंडूवर पॅट कमिन्सच्या गोलंदाजीवर पायचीत झाला. सलग दोन सामन्यांत शतक झळकावून इतिहास घडवणाऱ्या शिखर धवनची बॅट आज थंड पडली. कमिन्सनं तिसऱ्या षटकात त्याचा ( ६) त्रिफळा उडवला. रिषभ पंत व कर्णधार श्रेयस अय्यर यांनी डाव सावरला. पंतनं खणखणीत षटकार खेचून विक्रमाला गवसणी घातली. दिल्ली कॅपिटल्सकडून १०० षटकार मारणारा तो पहिलाच फलंदाज ठरला. शिवाय आयपीएलमध्ये सर्वात कमी चेंडूंचा ( १२२४ चेंडू) सामना करून १०० षटकार खेचण्याचा भारतीय फलंदाजाचा विक्रमही त्यानं नावावर केला. यापूर्वी युसूफ पठाणनं १३०८ चेंडूंचा सामना करून षटकाराचे शतक साजरे केले होते.
पण, १२व्या षटकात वरुण चक्रवर्थीनं DCच्या रिषभ पंतला ( २७) चालतं केलं. पंत-अय्यर जोडीनं तिसऱ्या विकेटसाठी ६३ धावांची भागीदारी केली. वरुणनं पुढच्याच षटकात दिल्लीला सलग दोन धक्के दिले. शिमरोन हेटमायर ( १०) आणि श्रेयस अय्यर ( ४७) हे माघारी परतल्यानं दिल्लीचा निम्मा संघ ९५ धावांत तंबूत गेला होता. चक्रवर्थीचे हे धक्कातंत्र पुढील षटकातही कायम होते. यावेळी त्यानं मार्कस स्टॉयनिसला ( ६ ) बाद केले. अक्षर पटेलही ( ९) त्याच षटकात माघारी परतला. वरून चक्रवर्थीनं यंदाच्या मोसमात एका सामन्यात पाच विकेट घेणाऱ्या गोलंदाजाचा पहिला मान पटकावला.
कोलाकाता नाईट रायडर्सकडून सुनील नरीन ( २०१२) याच्यानंतर पाच विकेट घेणारा तो पहिलाच गोलंदाज आहे. अनकॅप भारतीय खेळाडूनं एका सामन्यात पाच विकेट घेण्याची ही दुसरी वेळ. २०१८मध्ये अंकित राजपूतनं किंग्स इलेव्हन पंजाबसाठी सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध ५/१४ अशी कामगिरी केली होती. वरूणनं आज २० धावात देताना ५ विकेट्स घेतल्या.