सलग दोन विजयामुळे आत्मविश्वास उंचावलेला दिल्ली कॅपिटल्स ( Delhi Capitals) संघाला Indian Premier League ( IPL 2020) मध्ये आजच्या सामन्यात पराभव पत्करावा लागला. सनरायजर्स हैदराबाद (Sunrisers Hyderabad ) संघानं यंदाच्या पर्वातील पहिल्या विजयाची नोंद केली. डेव्हिड वॉर्नर ( David Warner), जॉनी बेअरस्टो ( Jonny Bairstow) आणि केन विलियम्सन ( Kane Williamson ) यांनी दमदार खेळ करत संघाला समाधानकारक पल्ला गाठून दिला. त्यानंतर रशीद खान ( Rashid Khan) नं मॅच विनिंग गोलंदाजी केली. त्याला भुवनेश्वर कुमार, खलील अहमद, अभिषेक वर्मा आणि टी नटराजन यांची सुरेख साथ लाभली. सामन्यात मॅन ऑफ दी पुरस्कार जिंकणारा रशीद खान भावुक झालेला पाहायला मिळाला. या क्षणी त्याला त्याच्या आई-वडिलांची सर्वाधिक आठवण येत होती आणि त्यानं लगेचचं 'ग्रेट' काम केलं.
दिल्ली कॅपिटल्सनं नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. वॉर्नरने 33 चेंडूंत 3 चौकार 2 षटकारांसह 45 धावा केल्या. बेअरस्टो 48 चेंडूंत 2 चौकार व 1 षटकारासह 53 धावा करून माघारी परतला. केननंही 26 चेंडूंत 5 चौकारांसह 41 धावा केल्या. सनरायझर्स हैदराबादनं ( SRH) 20 षटकांत 4 बाद 162 धावा केल्या. लक्ष्याचा पाठलाग करताना DCचा सलामीवीर पृथ्वी शॉ ( Prithvi Shaw) 2 धावांवर पहिल्याच षटकात माघारी परतला. त्यानंतर शिखर धवन ( 34), रिषभ पंत ( 28) आणि शिमरोन हेटमायर ( 21) यांनी संघर्ष केला, परंतु त्यांना अपयश आलं. दिल्लीला 7 बाद 147 धावा करता आल्या. हैदराबादनं 15 धावांनी सामना जिंकला.
रशीदनं 4 षटकांत 14 धावा देत 3 विकेट्स घेतल्या. आयपीएलमधील त्याची ही सर्वोत्तम कामगिरी ठरली. 3/14 वि. दिल्ली कॅपिटल्स, अबु धाबी 20203/19 वि. गुजरात लायन्स, हैदराबाद 20173/19 वि. किंग्स इलेव्हन पंजाब, 20103/19 वि. कोलकाता नाइट रायडर्स, 2018
मॅन ऑफ दी मॅच पुरस्कार स्वीकारताना रशीद खान म्हणाला,''मला आपला दबदबा निर्माण करायचा आहे, असा विचार करून मी स्वतःवर दडपण घेत नाही. मी शांत आणि एकाग्रतेनं आपला खेळ खेळतो. त्यामुळेच कदाचित यश मिळत असावे. आजचा हा पुरस्कार मी माझ्या आई-वडिलांना समर्पित करतो. मागील दीड वर्ष ही माझ्यासाठी आव्हानात्मक होती. मी वडिलांना गमावले आणि तीन महिन्यानंतर आईचेही निधन झाले. ती माझी सर्वात मोठी फॅन होती. हा पुरस्कार त्यांच्यासाठी. जेव्हा जेव्हा मला पुरस्कार मिळायचा, ती पूर्ण रात्र ती माझ्याशी गप्पा मारायची. पण, आता ती नाही.''