पार्ल - दक्षिण आफ्रिकेचा गुणवान फलंदाज एबी डिव्हिलियर्सने आज बांगलादेश विरुद्धच्या दुस-या एकदिवसीय सामन्यात डोळयाचे पारणे फेडणारी फटकेबाजी केली. डिव्हिलियर्सने तुफानी फटकेबाजी करत 104 चेंडूत 176 धावा चोपून काढल्या. यात 15 चौकार आणि सात षटकारांचा समावेश होता.
कर्णधारपदावरुन पायउतार झाल्यानंतर पहिल्याच सामन्यात खेळताना त्याने बांगलादेशच्या गोलंदाजांचा अक्षरश: पालापाचोळा केला. त्याने मैदानावर चौफेर फटकेबाजी करत उपस्थितांची मने जिंकली. डिव्हिलियर्सच्या तुफानी खेळीच्या जोरावर दक्षिण आफ्रिकेने प्रथम फलंदाजी करताना 353 धावांचा डोंगर उभारला.
बांगलादेशचा डाव 48 व्या षटकात 249 धावात आटोपला. दक्षिण आफ्रिकेने बांगलादेशचा 104 धावांनी पराभव केला. तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेत दक्षिण आफ्रिका 2-0 ने आघाडीवर आहे. बांगलादेशचा संघ दक्षिण आफ्रिकेच्या दौ-यावर आहे.