-अयाझ मेमन
ऑस्टे्रलियाचे माजी क्रिकेटपटू डीन जोन्स यांच्या निधनाची धक्कादायक बातमी मिळाली आणि क्रिकेटविश्वावर शोककळा पसरली. आयपीएलसाठी समालोचन करण्याकरिता भारतात आलेल्या जोन्स यांना मुंबईत गुरुवारी हृदयविकाराचा झटका आला. जोन्स यांच्या अचानकजाण्याने क्रिकेटविश्वाचे खूप मोठे नुकसान झाले आहे.
डीन जोन्स यांच्यासोबत माझ्या खूप चांगल्या आठवणी आहेत. सर्वप्रथम मी त्यांना १९८६ साली भेटलो होतो. तेव्हा पहिल्यांदाच मी त्यांना पाहिले होते. मी तेव्हा चेन्नईला (मद्रास) भारत-आॅस्टेÑलिया कसोटी सामन्याचे वृत्तांकन करण्यास गेलो होतो. त्या सामन्यात जोन्स यांनी शानदार २१० धावांची खेळी करीत सामना अनिर्णीत राखला होता. ती एक जबरदस्त खेळी होती. त्या एका खेळीमुळे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये त्यांचा दर्जा खूप उंचावला होता. शिवाय त्या सामन्यात ते आजारी होते, त्यांनी उलट्याही केल्या होत्या. पण अशा परिस्थितीतही त्यांनी झुंज देताना सामना अनिर्णीत राखला होता. एकेरी-दुहेरी धावा काढण्यात जोन्स तरबेज होते. त्या सामन्यात अत्यंत उष्ण वातावरण होते. त्यामुळेच या उष्ण वातावरणात सातत्याने एकेरी-दुहेरी धाव घेताना त्यांना त्रास झाला.
संघाचे प्रशिक्षक बॉब सिम्पसन यांनी त्यांना रिटायर्ड होऊन पॅव्हेलियनमध्ये परतण्याचा सल्लाही दिला होता. पण, जोन्स यांनी तसे केले नाही आणि २१० धावा करून सामना अनिर्णीत राखला. तो सामना टाय झाला होता. क्रिकेट इतिहासात केवळ दुसऱ्यांदा तो सामना टाय झाला होता. या सामन्यानंतर मी त्यांच्याशी चर्चा केली होती. तेव्हा मी त्यांना विचारले होते की, ‘इतके कष्ट घेऊन का खेळलात?’ कारण त्यांना सामन्यानंतर सलाईनही घ्यावे लागले होते. त्यावर जोन्स म्हणाले होते की, ‘जर मी हे कष्ट घेतले नाहीत, तर संघात माझी जागा कुणी दुसरा खेळाडू घेईल.’
यावरून जोन्स आपल्या खेळाशी, संघाशी किती समर्पित होते हे कळून येते. आॅस्टेÑलियाचा दिग्गज खेळाडू बनण्याचे त्यांचे लक्ष्य त्या वेळी दिसून आले होते. त्यानंतर अॅलन बॉर्डर यांच्या विश्वचषक विजेत्या आॅस्टेÑलिया संघातील ते अत्यंत महत्त्वाचे खेळाडू म्हणून सर्वांपुढे आले होते. यानंतरही त्यांनी कसोटी क्रिकेटमध्ये आॅस्टेÑलियासाठी अनेक शानदार खेळी केल्या. मात्र माझ्या मते ते एकदिवसीय क्रिकेटमधील एक महान क्रिकेटपटू होते.एकदिवसीय क्रिकेटमध्ये इतर खेळाडूंच्या तुलनेत त्यांच्यात असलेली क्षमता जबरदस्त होती. आक्रमक फटकेबाजी, एकेरी-दुहेरी धाव घेण्यात माहीर आणि याशिवाय चपळ क्षेत्ररक्षण असे कौशल्य जोन्स यांच्याकडे होते. केवळ मीच नाही, तर त्यांच्याविरुद्ध खेळलेले भारतीय खेळाडूही त्यांची महानता मान्य करतील. त्या वेळी एकदिवसीय क्रिकेटमध्ये विव्ह रिचडर््स, जावेद मियांदाद आणि जोन्स यांच्याकडे सर्वांत धोकादायक फलंदाज म्हणून पाहिले जात होते. मी काही सामन्यांचे समालोचनही केले आणि त्या वेळी जोन्स यांना जवळून ओळखता आले. त्यांच्याकडे क्रिकेट ज्ञानाचा खजिना होता. ते खासकरून उपखंडातील क्रिकेटविश्वाचे एक चांगले मित्र होते.