नवी दिल्ली : आयुष्यात असे काही दिवस असतात ते कायम लक्षात राहतात. काही वेळाला तो दिवस लक्षात नसला तरी त्या दिवशी नेमकं काय घडलं, हे सांगितलं तर ते चित्र आपल्या डोळ्यापुढे उभं राहतं. क्रिकेट जगतासाठी आजचा दिवस वाईट असाच होता. कारण ज्या कर्णधाराच्या नेतृत्त्वाचे गुण गायले जायचे, ज्याच्यावर मॅचफिक्संगचे आरोप झाले त्या दक्षिण आफ्रिकेचा माजी कर्णधार हन्सी क्रोनिएचा आजच्या दिवशीच अपघातामध्ये मृत्यू झाला होता. आजच्या दिवशी २००२ साली क्रोनिएला विमान अपघातामध्ये जीव गमवावा लागला होता.
कसा झाला होता अपघातक्रोनिएला १ जून २००२ साली जोहान्सबर्गहून जॉर्जला नेण्यात येणार होते. विमानामध्ये तांत्रिक बिघाड झाल्यामुळे क्रोनिएला हेलिकॉप्टरने नेण्याचे ठरवले. त्या हेलिकॉप्टरमध्ये क्रोनिएसह दोन पायलेट होते. हे हेलिकॉप्टर जॉर्ज विमानतळाच्या जवळ आले तेव्हा पायलेटला समोरचे काहीच दिसेनासे झाले. त्यामुळे हेलिकॉप्टर कुठे उतरवायचे, हा त्याला प्रश्न पडला. अखेर या हेलिकॉप्टरचा अपघात झाला आणि त्यामध्ये क्रोनिएचा मृत्यू झाला.
अशी होती क्रोनिएची कारकिर्दक्रोनिएने १९९२ साली झालेल्या विश्वचषकात पदार्पण केले. यजमान ऑस्ट्रेलियाविरुद्ध क्रोनिए पहिला सामना खेळला. १९९४ साली केपलर वेसल्सला दुखापत झाल्यामुळे क्रोनिएकडे संघाच्या नेतृत्त्वाची कमान सोपवण्यात आली. क्रोनिएच्या नेतृत्त्वाखाली दक्षिण आफ्रिकेने १३८ सामने खेळले, यामध्ये ९९ सामन्यांमध्ये त्यांना विजय मिळवला. ७ एप्रिल 2000 साली क्रोनिएवर मॅच फिक्सिंगचा आरोप लावण्यात आला. आयसीसीने त्याच्यावर आजीवन बंदी घालण्याचा निर्णय घेतला होता.