नवी दिल्ली : ब्रिटनच्या महाराणी एलिझाबेथ द्वितीय (Queen Elizabeth II) यांचे वयाच्या ९६ व्या वर्षी निधन झाले. मागील काही काळापासून त्या आजारी होत्या. महाराणी एलिझाबेथ द्वितीय या सध्या स्कॉटलंडच्या Balmoral castle मध्ये वास्तव्यास होत्या. ब्रिटनच्या राणी यांचे निधन झाल्यानंतर इंग्लंड आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील तिसऱ्या आणि अंतिम कसोटी सामन्याच्या दुसऱ्या दिवसाचा खेळही रद्द करण्यात आला आहे. दोन्ही संघांसाठी हा कसोटी सामना खूप महत्त्वाचा आहे, कारण जो संघ हा सामना जिंकेल तो मालिकेवर कब्जा करेल. या मालिकेत दक्षिण आफ्रिका आणि इंग्लंड हे दोन्ही संघ १-१ ने बरोबरीत आहेत. आफ्रिकेने लॉर्ड्सवरील पहिली कसोटी जिंकली, तर इंग्लंडने शानदार पुनरागमन करत मालिकेत बरोबरी साधली होती.
वयाच्या ९६ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वासब्रिटनच्या महाराणी एलिझाबेथ द्वितीय मागील मोठ्या कालावधीपासून आजारी होत्या. अनेक दिवस मृत्यूशी संघर्ष करत असलेल्या राणी यांनी वयाच्या ९६ व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. महाराणी एलिझाबेथ यांच्यानंतर त्यांचे सुपुत्र चार्ल हे ब्रिटनचे राजे असतील. गुरूवारीच एलिझाबेथ द्वितीय यांची प्रकृती खालावल्याची माहिती समोर आली होती. त्यानंतर त्यांचे कुटुंबीय स्कॉटलंडला रवाना झाले होते. महाराणी या episodic mobility या आजाराने ग्रस्त होत्या अशी माहिती शाही कुटुंबाकडून देण्यात आली. त्यांना चालण्यात आणि उभे राहण्यातही त्रास होत होता. महाराणी एलिझाबेथ द्वितीय यांना फेब्रुवारी महिन्यातच कोरोनाची लागणही झाली होती.
आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या दृष्टिकोनातून देखील हा सामना खूप महत्त्वाचा आहे. दुसऱ्या कसोटीत इंग्लंडकडून पराभव पत्करावा लागल्याने दक्षिण आफ्रिकेने WTC क्रमवारीतील आपले अव्वल स्थान आधीच गमावले आहे. कसोटी क्रमवारीत ऑस्ट्रेलिया आता पहिल्या, श्रीलंका तिसऱ्या, भारत चौथ्या, पाकिस्तान पाचव्या, वेस्ट इंडिज सहाव्या आणि इंग्लंड सातव्या स्थानावर स्थित आहे. दुसऱ्या दिवसाचा खेळ रद्द झाल्याची माहिती इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट बोर्डाने ट्विट करून दिली. राणी एलिझाबेथ द्वितीय यांच्या निधनामुळे इंग्लंड आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील शुक्रवारचा सामना रद्द करण्यात आल्याचे ट्विटमध्ये म्हटले आहे.
अनेक खेळांचे आयोजन रद्दया कसोटी सामन्याशिवाय ब्रिटनची राणी यांच्या निधनामुळे ब्रिटनमधील अनेक क्रीडा स्पर्धा रद्द करण्यात आल्या आहेत. बीएमडब्ल्यू पीजीए चॅम्पियनशिपमधील दिवसाचा खेळ थांबवण्यात आला. याशिवाय ब्रिटनमधील घोड्यांच्या शर्यती आणि रग्बी सामनेही रद्द करण्यात आले आहेत. ब्रिटनमधील सायकलिंग टूरच्या आयोजकांनी सांगितले की शुक्रवारची शर्यत रद्द करण्यात आली आहे. प्रीमियर लीगच्या खाली तीन विभाग चालवणाऱ्या इंग्लिश फुटबॉल लीगने सांगितले की, शुक्रवारी संध्याकाळी होणारे सामने देखील रद्द करण्यात आले आहेत.